भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई संपण्याचे नावच घेत नाही, असे वाटू लागले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीवाडी, राजाचीवाडी या वाड्यांची त्यामध्ये भर पडली आहे.
शहापूर तालुक्यात पावसाळा सुरू होण्याच्या आधी मात्र पाणीटंचाई तीव्र होत असताना दिसते. अनेक गाव, पाडे पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झाले आहे. सकाळची कामाची सुरु वात व संध्याकाळी शेवटही याच पाणीसमस्येने होतो. कधी नव्हे ती गावे व पाडे आज पाणीसमस्येने ग्रस्त झाले आहेत. पुढील वर्षी मात्र ही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून त्यावर काय उपाययोजना केल्या, हेही पाहणे आवश्यक झाले आहे.
तालुक्यात सद्य:स्थितीत २०० गावपाड्यांवर हे संकट ओढवले आहे. कलभोंडे, पाटीलवाडी, नवीनवाडी, राजाचीवाडी या सर्वच वाड्यांत टँकरने पाणी सुरू असून ते कमी पडत आहे. त्यातच तीनतीन दिवसांआड टँकर येत असल्याने नागरिकांना मिळालेले पाणी पुरवून वापरावे लागत आहे. मात्र, कधीकधी विहिरीतील झऱ्याच्या पाण्यासाठीही तासन्तास विहिरीवर ताटकळत बसावे लागते. या तिन्ही पाड्यांतील लोक विहिरीतील पाण्याचा वापर करत असतात. नदीपात्रातील भागात वनविभागाच्या मदतीने बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयात पाणी साठवून राहिल्याने त्याचा या लोकांना चांगला वापर करता येतो. मात्र, या वर्षी त्यामध्येही पाणी नसल्याने मोठी अडचण झाली आहे.
या पाड्यांमध्ये असलेल्या विहिरी आटत नाही. बºयाच दिवसांपर्यंत हे पाणी पुरत असे. मात्र, यावर्षी लवकरच टंचाई निर्माण झाली. ही टंचाई लवकर कमी होण्यासाठी आता वळवाच्या पावसाची वाट बघत बसावी लागणार आहे.
हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू असते. त्यात वरून सूर्य आग ओकत असल्यामुळे त्यांच्या हालात अधिकच भर पडत आहे.सध्या मोठ्या संख्येने गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच गावपाड्यांना दररोज पाणी पुरवणे शक्य नाही. मात्र, तीही काळजी घेतली जात आहे. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता
या परिसरातील पाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी पुरत नाही. - जानू हिरवे, म. ठाकूर आदिवासी संघटना