ठाणे : यंदा बाप्पांचे आगमन जसे खड्ड्यांतून झाले, त्याचप्रमाणे बाप्पांची विसर्जन मिरवणूकही खड्ड्यांतूनच होणार आहे. ठाणे महापालिकेने पावसाचे कारण देऊन ते पडल्याचे मान्य केले आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामधील सर्व शहरांत असलेल्या विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गांवर चार हजार ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला आहे. त्यातच, विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार असून गरज पडल्यास ड्रोनचाही वापर केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातून बाप्पांचे आगमन झाले तसेच पाऊस थांबत नसल्याने ते बुजण्यात अडथळे येत आहेत. यामुळे गुरुवारी बाप्पांची विसर्जन मिरवणूक ही खड्ड्यांतून मार्गक्रमण करणार असून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ११ दिवसांचे ३३ हजार ६५२ बाप्पांचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७४४ सार्वजनिक तर ३२ हजार ९०८ खासगी गणपतींचा समावेश आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस दलातील चार हजार अधिकारी-कर्मचाºयांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या, होमगार्ड आणि शीघ्रकृती दल असा साडेचार हजारांहून अधिक पोलिसांचा समावेश आहे. याचबरोबर महिलांची होणारी छेडछाड किंवा इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष महिला पोलीस तैनात ठेवल्या आहेत. त्याचबरोबर पाच परिमंडळांतील तलाव आणि खाडीकिनारी असलेल्या गणेश विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्यातूनच, मुंब्रा आणि भिवंडी यासारखी ठिकाणे संवेदनशील आहेत.सातत्याने पाऊस सुरू आहे. तरीही, महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करीत आहे. तरी पावसातही यंत्रणेने काम सुरू ठेवले आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा