अंबरनाथ : पश्चिमेतील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या येवले चहा विक्रेत्याच्या दुकानात विकास सोमेश्वर या ग्राहकाच्या चहाच्या कपात कप धुण्यासाठी वारल्या जाणाऱ्या घासणीची तार आढळली आहे. ग्राहकाने तक्रार केली असता दुकानदाराने उद्धट उत्तरे दिली. अखेर ग्राहकाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सर्व चहा फेकून दिवसभर दुकान बंद ठेवण्याची वेळ दुकानदारावर आली. याबाबत अन्न व औषध पुरवठा विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही सोमेश्वर यांनी सांगितले आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातही नगरपालिकेसमोर येवले चहाचे दुकान काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. या दुकानात चहा पिण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सोमवारी दुपारी अंबरनाथ पश्चिम येथे राहणारे सोमेश्वर हे सहकाऱ्यांसह येवले चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले होते. त्यांच्या चहाच्या कपात कप धुवण्यासाठी वापरण्यात येणाºया घासणीच्या तारा आढळल्या. याबाबत त्यांनी दुकानात काम करणाºया कर्मचाºयाकडे विचारणा केली असता त्याने विकास यांना उद्धट उत्तर दिले. अखेर संतापलेल्या विकास यांनी इतर ग्राहकांच्या जीवाला या चहामुळे धोका उद्भवू नये यासाठी सर्व चहा फेकण्यास भाग पाडले. ग्राहकांचा संताप पाहता दुकानदाराने दिवसभर दुकान बंद ठेवले होते. दरम्यान, दुकानाचे मालक नंदलाल तेजवणी यांनी चूक कबूल केली असून पुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेऊ, असे स्पष्ट केले.