विशाल हळदे -
सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच आज सखल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात खडाजंगी झाली. सखल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यासाठी टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी आले होते. यावेळी हा प्रकार घडला.
मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय, कार्यक्रम, सभा घेऊ नये, अशी मागणी पत्रकात करण्यात आल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना काही उलट प्रश्न केले.
तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर राजन विचारे चालतात, जितेंद्र आव्हाड चालतात, मग ठाण्यात आमदार, खासदार का नकोत? सर्व पक्षीय आमदार, खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक आहेत. मग त्यांना शहरात बंदी का? असे प्रश्न नरेश मस्के यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केले.
यावर, नरेश मस्के आमची मागणी मान्य करत नाहीत, आमचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले नाही, आम्हाला बोलू न देता स्वतः राजकीय भाषा वापरत विषय भरकटवत असल्याचे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.