लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्यात ठाण्यातील ज्या प्रभागात रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, लोकांची गैरसोय होणार नाही, अशा प्रभागातील अधिकाऱ्यांचा आपण सत्कार करू, मात्र जिथे दिरंगाई आणि निष्काळजीपणा आढळेल, तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला. ठाण्यातील रस्त्यांच्या तसेच नालेसफाईच्या कामांची पाहणी करीत असताना टिकुजिनी वाडी येथे डांबरीकरणाचे काम सुरू असताना कामगारांना सुरक्षा साधने न पुरविणाऱ्या कंत्राटदाराला शिंदे यांनी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली.
वर्तकनगर, पोखरण रोड क्रमांक-१ येथील कानवूड जंक्शन, पवारनगर आणि टिकुजीनीवाडी ते निळकंठ रस्ता तसेच बटाटा कंपनी, मानपाडा आणि कोरम मॉल मागील नाला आदी ठिकाणच्या नाल्यांची आणि रस्त्यांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनविणारे कामगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी कंत्राटदाराला खडसावले. पोखरण रोड क्रमांक २ च्या रखडलेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. वर्क ऑर्डर देऊनही रस्त्यांचे काम वेळेत न झाल्याने मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले.
कामांचा घेतला आढावा या पाहणी दाैऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेत असून रस्ते, पदपथ आणि नालेसफाईच्या कामांचा यात समावेश आहे. १३४ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे केली जात असून यात काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि यूटीडब्ल्यूटीद्वारेही चांगल्या दर्जाची कामे हाेत आहेत. आयआयटीला रस्त्यांच्या कामांचे नमुने पाठविले जाणार असून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. एका खड्ड्याला एक लाखांचा दंड ठेकेदाराला भरावा लागणार आहे. त्यामुळे चांगल्या कामांवर ठेकेदारांचा भर आहे. नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास सामान्य नागरिकांना नको, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
क्लस्टरमुळे चांगल्या दर्जाची घरेक्लस्टरचे काम सर्वसामांन्यासाठी सुरू आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची घरे मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा टोला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. म्हाडा उत्तम काम करीत असल्यामुळे म्हाडाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले. या पाहणी दौऱ्यात पालिका आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांचा समावेश होता.
विकासकामांसाठी दिले ६०० कोटीकोरोना काळात महापालिकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ६०० कोटी दिले आहेत. या निधीमधून शहरात चांगली कामे होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सांगितले. ठाणेकरांच्या सुविधेकरिता रस्त्यांच्या कामावर भर दिल्याचे ते म्हणाले.
पाहणी दाैऱ्यात जेसीबी, पोकलेनने दिला दगा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नालेसफाई दौराच्या आधीच भीमनगर येतील नाल्यात पोकलेनचा अपघात झाला. नालेसफाई सुरू असताना पोकलेन नाल्यात रुतून उलटला. त्यामुळे ऐनवेळी शिंदे यांच्या दाैऱ्याचे ठिकाण बदलले. महापालिका अधिकाऱ्यांनी भीमनगर नाल्याच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. त्यामुळे भीमनगरच्या ऐवजी पोखरण दोन नंबर येथून दाैऱ्याला सुरुवात झाली. दुसऱ्या एका नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या जेसीबीचा टायर पंक्चर झाल्याने नालेसफाईत अडथळा निर्माण होत असल्याचे उघड झाले.