सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिकेवर निवडून जाण्यासाठी धनदांडगे उमेदवार झोपडपट्टीवासीयांना शपथ घेण्यास भाग पाडून पैसा व भेटवस्तू वाटत आहेत, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.महापालिकेवर आपल्याच पक्षाची सत्ता येण्यासाठी भाजपा-शिवसेना, साई, ओमी टीम, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर लहान पक्षांनी कंबर कसली असून पैशांचा अक्षरश: धूर निघत आहे.निष्ठावंतांना डावलून राजकारणाचा गंध नसणाऱ्या धनदांडग्यांना सर्वच पक्षांनी तिकिटे दिली आहेत. ‘जिंकण्यासाठी काहीपण’ याची प्रचीती सध्या हे उमेदवार व त्यांचे समर्थक देत आहेत. धनदांडग्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या झोपडपट्टी परिसरातील चकरा वाढल्या आहेत. गरीब, गरजू मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मत देण्याची शपथ घेण्यास भाग पाडले जाते व मग पैसे व भेटवस्तू दिल्या जात आहेत. सम्राट अशोकनगर, सुभाष टेकडी, शांतीनगर, हिराघाट, पवई चौक, करोतियानगर, गुलशननगर, खेमानी टेकडी, डम्पिंग ग्राउंड, जयजनता कॉलनी, कैलास कॉलनी, तानाजीनगर, सिद्धार्थनगर लेबर कॉलनी, रेणुका सोसायटी, स्टेशन परिसर, संजय गांधीनगर, गणेशनगर, प्रेमनगर टेकडी, गायकवाडपाडा, शहाड गावठण, संतोषनगर आदी असंख्य झोपडपट्टीत पैसे व भेटवस्तूंचे वाटप व शपथ घेण्याचा विषय चर्चिला जात आहे. एकाच घरात तीन, दोन तिकिटे वाटलेली असून प्रभागातील कुठल्याकुठल्या उमेदवारांना मते टाकायची, हे सांगून मग शपथ घेण्यास सांगून सौदा केला जात आहे. पैसे वाटणाऱ्या काही हौशी कार्यकर्त्यांनी शपथ घेणाऱ्या काही मतदारांचे शूटिंग करून दबावाचे राजकारण सुरू केले आहे. शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी तर प्रभाग क्र.-१८ मध्ये मुक्काम ठोकला. रात्रीचे २ वाजेपर्यंत ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असल्याचे चित्र आहे. शहर पूर्वेतील जबाबदारी किणीकर यांना दिल्यावर त्यांनी एकाच प्रभागात मुक्काम ठोकल्याने चर्चेला उधाण आले.
दिल्या-घेतल्या रकमेची शपथ तुला आहे...
By admin | Published: February 16, 2017 1:51 AM