शेणवा : शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आजोबा पर्वत देवस्थानाकडे जाणाऱ्या साकुर्ली-गुंडे रस्त्यावरील पुलासाठी कांबे परिसरातील तरुण आक्र मक झाले आहेत. कमी उंचीचा हा पूल पावसाळ््यात वारंवार पाण्याखाली जात असल्याने आसपासच्या १० गावांचा संपर्कतुटतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणाºया लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
साकुर्ली-गुंडे रस्त्यावरील शाई नदीवरील कांबे गावाजवळील पूल सुमारे ६० वर्षांपूर्वीचा असून त्याची उंची अतिशय कमी आहे. ५० मीटरपेक्षा अधिक लांबीचा हा पूल जुना झाला असून पावसाळ््यात अनेकदा पाण्याखाली जातो. बºयाचदा ३ ते ४ दिवस पुलावरचे पाणी ओसरत नाही. पाण्याच्या प्रवाहात या पुलाला भगदाडही पडले आहे.दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जातो. त्यामुळे पावसाळ््यात गुंडे ग्रामपंचायतीमधील कांबे, गुंडे, पाचघर, रसाळपाडा, डेहणे, वरपडी, चिंचवाडी, वालशेत व बाजूच्या दोन आदिवासी वाड्यांचा नेहमीच संपर्क तुटतो.
विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांचे हाल होतात. अनेकदा पुलापलिकडेच तासनतास थांबून पाणी ओसरण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्र्षांपासून केली जात आहे. २०१४ च्या निवडणुकीच्यावेळी आमदार पांडुरंग बरोरा यांनीही या पुलाचे काम करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती स्थानिक कार्यकर्ते वसंत रसाळ यांनी दिली. मात्र, अद्याप कांबे पुलाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने स्थानिक तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी येणाºया कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या गाड्यांचा ताफा पुलावरच अडवून जाब विचारायचा निर्धार तरुणांनी केला आहे. दरम्यान, शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अरुण जाधव यांच्याशी संपर्कसाधला असता तो होऊ शकला नाही.
मागील निवडणुकीमध्ये आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपण निवडून आल्यानंतर तीन महिन्यांत नवीन पूल बांधून देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, पाच वर्षे पूर्ण झाली तरी पूल जैसे थे आहे. त्यामुळे विधानसभेला गुंडे ग्रामपंचायतीतील आम्ही सर्व तरु णांनी कुणाही उमेदवाराला पूल ओलांडू द्यायचा नाही असा निर्धार केला आहे. - हरीश तिवारी, तरुण
साकुर्ली-गुंडे भागातील रस्त्यांचे डांबरीकरण दीड वर्षापूर्वी पूर्ण केले आहे. तसेच कांबे पुलाचा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवलेला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. - पांडुरंग बरोरा, आमदार