कल्याण: कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकलमधून एक तरुण रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या नाल्यात पडला. मात्र त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवण्याऐवजी अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली. ही घटना पाहणाऱ्यांनी मोबाईलसाठी खिशात हात घालण्याऐवजी तोच हात मदतीसाठी पुढे केला असता, तर तरुणाचा प्राण वाचू शकला असता. या घटनेवरून माणुसकी सोशल मीडियात हरवल्याचं गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आलं. शहाड-कल्याण स्थानकादरम्यान चालत्या गाडीतून दोन तरुण रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या नाल्यात पडले. त्यापैकी एकाने कसा बसा प्रयत्न करत नाल्यातून बाहेर येण्यात यश मिळवलं. मात्र त्यानं दुस:या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने बाहेर येताच धूम ठोकली. दुसऱ्या तरुणाच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्याचा बुडून जीव जात असताना वेळीच त्याच्या मदतीसाठी धावून जाण्याऐवजी काही जण बघ्याची भूमिका घेऊन संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करत होते. तर काहीजण फोटो काढण्यात गर्क झाले होते. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे माणुसकी हरवल्याचं चित्र यामुळे पाहायला मिळाली.
माणुसकी हरवतेय... तो नाल्यात बुडत होता अन् सगळे फोटो काढत होते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:16 PM