मुंब्रा : दिवा-शिळ भागातील बेतवडे गावात मंगळवारी सायंकाळी खदाणीत पोहण्यासाठी गेलेला देवेंद्र दळवी (३५) हा बुडाल्याची घटना घडली. त्याचा शोध घेण्यासाठी स्कूबा डायव्हर यांना पाचारण केल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
दळवी सायंकाळी ५ च्या सुमारास खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि टीडीआर पथकाने घटनास्थळी धाव घेत, शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने व खाणीची खोली ३० फूट असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी स्कूबा डायव्हरच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमद्वारे त्याचा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. दरम्यान, २० जूनपासून ठामपा क्षेत्रातील तलाव तसेच खदाणीत बुडून आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
--------------------