ठाणे : मुंब्रा खाडीत एका तरुणाने उडी मारल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे ठाण्यातील उथळसर भागातील जीवन ओहाळ (वय ३०) या तरुणाने वडिलांबरोबर झालेल्या कौटुंबिक कलहातून उथळसर नाल्यात उडी मारली. ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला. पावसामुळे नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडथळे निर्माण झाल्याने त्याचा शोध लागला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, याच नाल्यात वाहून जाणाऱ्या एका मुलीला पाच वर्षांपूर्वी त्याने वाचविले होते.
रविवारी पहाटेपर्यंत अवघ्या चार तासांमध्ये ठाणे शहरात १४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी भरल्यामुळे उथळसरच्या नाल्यातही पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्याचवेळी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर रोड येथील मीनाताई ठाकरे चौक, उथळसर नाल्यात जीवन या तरुणाने रागाच्या भरात उडी मारली. ही माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांनी धाव घेत पहाटे भर पावसात दोन तास शोधकार्य केले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे काही वेळ शोधकार्य थांबविले होते. पुन्हा सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते ५ अशी तीन वेळा ही शोधमोहीम राबविण्यात आली. डॉ. आंबेडकर रोडजवळील नाला ते साकेत खाडी परिसरामध्ये हे शोधकार्य करण्यात आले. परंतु, नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तो नंतर थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
................
जीवनला पोहताही येत होते....
नाल्यात उडी घेतलेल्या जीवन याला चांगले पोहताही येत होते. पाच वर्षांपूर्वी अशा नाल्याच्या पाण्यातून त्याने एका मुलीचा जीवही वाचविला होता. आता मात्र त्याच पाण्याने त्याला साथ दिली नाही. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.