ठाणे - मुंब्रा खाडीत एका तरुणाने उडी मारल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे ठाणे येथील उथळसर येथे राहणाऱ्या जीवन ओहाळ (३०) या तरुणाने उथळसर नाल्यात उडी मारल्याची घटना समोर आली. त्यानंतर ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध पहाटे, सकाळी आणि दुपारी असा नाला ते साकेत खाडी दरम्यान घेतला. पण, तो अद्यापही मिळून आलेला नाही. त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडथळे येत असल्याने पुन्हा शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
शनिवारी रात्री आणि रविवारी ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री चार तासात १४२ मिमी पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यातच नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह जोरात वाढला होता. याचदरम्यान सव्वादोन वाजण्याच्या सुमारास डॉ आंबेडकर रोड येथील मीनाताई ठाकरे चौक, उथळसर नाल्यात जीवन ओहाळ या तरुणाने उडी मारली. याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF Team) यांनी धाव घेत, पहाटे २ तास शोधकार्य केले, परंतु नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही वेळ शोधकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी ८ ते १० असे पुन्हा २ तास शोधकार्य करण्यात आले.त्यानंतर घटनास्थळी पुन्हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंबेडकर रोड जवळील नाला ते साकेत खाडी परिसरामध्ये सुमारे ३ तास शोधकार्य करण्यात आले परंतु नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पुन्हा शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.