अंबरनाथ: अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या सुमेध वेलायुधन या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पोलिसांनी मात्र मारहाण झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.अंबरनाथ पश्चिमेला राहणारा वेलायुधन हा तरुण त्याच्या बहिणीसह सोमवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला होता. यावेळी खाडे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितले. नंतर पाटील कॉन्स्टेबलनी त्याला आतमध्ये बोलावले. मात्र सुमेधला पाहून संतापलेल्या खाडे यांनी आतमध्ये कसा आला, अशी विचारणा केली. सुमेधच्या बहिणीने बोलण्याचा प्रयत्न केला असता, खाडे यांनी सरळ सुमेध याला मारायला सुरुवात केल्याचा आरोप त्याने केला. खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की, माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध याने केला.
यानंतर सुमेध याने अंबरनाथ सिटिझन फोरमचे सत्यजित बर्मन यांना घटनेची कल्पना दिली. बर्मन यांनी रात्री याबाबत पोलीस दलातील वरिष्ठांना ट्विट केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने याची त्वरित दखल घेतली. याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारले असता, त्यांनी मात्र पोलिसांनी कुणालाही मारहाण केलेली नसल्याचे सांगितले आहे.
शस्त्रक्रिया करण्याची गरजबुधवारी सकाळी सुमेध वेलायुधन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गेला असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमेधवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले. सुमेधला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बर्मन यांनी केली.