डोंबिवली : आजचा तरूण हा देशाचा आधारस्तंभ आहे. हा स्तंभ खिळखिळा करण्यासाठी अनेक देशविघातक शक्ती सातत्याने कार्यरत आहेत. ही पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मात्र तरुण पिढीने देखील त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विशेषत: विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ आणि इतर व्यसने यांपासून दूर रहावे, असे आवाहन सहा. पोलीस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डोंबिवलीतील ध्रुव आयएएस अॅकॅडमीतर्फे पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वाडेकर बोलत होते. टिळकनगर विद्यालयाच्या पेंढरकर सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती पदक विजेता वाडेकर यांना शहरमंत्री स्वरदा वैद्य हिच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या शिबीराला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी व्यासपीठावर अनिल घुगे, धु्रव अॅकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे, नगरसेवक संदीप पुराणिक, पीएसआय आर. बी. पाटील, विद्यार्थी परिषदेचे डोंबिवली राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मिहीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.अनिल घुगे यांनी पोलीस भरती प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक अभ्यास, मानसिक तयारी, फिजीकल फिटनेस याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. मिहीर देसाई यांनी अभाविपचे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सांगितले.
तरूणांनी अंमली पदार्थ, व्यसनांपासून दूर राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:41 AM