अंबरनाथ: आज सायंकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल गेल्याने एक 17 वर्षाची तरुणी गंभीर जखमी झाली. या तरुणीला तात्काळ रुग्णालयात हलवण्याऐवजी ॲम्बुलन्सची प्रतीक्षा करत तब्बल या तरुणीला अर्धा तास उपचाराविना तडफडत ठेवण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन सेवेची कार्यप्रणाली किती कुचकामी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
गर्दीच्या वेळेस लोकल ट्रेनमधून पडून अपघात घडणाऱ्यांची संख्या दिवसागणी वाढत आहे. या अपघात ग्रस्त प्रवाशांवर तत्काळ उपचार व्हावे यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात आपत्कालीन सेवा पुरवण्यात आली आहे. मात्र त्या सेवेकडे रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लक्ष देत नसल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईहून अंबरनाथला निघालेले लोकल अंबरनाथ स्थानकात येताच दिव्या संजय जाधव ही 17 वर्षाची तरुणी लोकल मधून पडली.
तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती सहप्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला देतात या तरुणीला स्ट्रेचरवरून रेल्वेच्या कार्यालयासमोर आणून ठेवण्यात आले. रेल्वे पोलिसांनी देखील तात्काळ या तरुणीला उपचार मिळावे यासाठी रुग्णालयात हलवणे गरजेचे असताना कागदपत्रे तयार करण्यासाठी वेळ घेतला तर दुसरीकडे तब्बल अर्धा तास रुग्णवाहिकाच न आल्याने ही तरुणी स्ट्रेचरवर तडफडत राहिली. अखेर अर्धा तासानंतर रुग्णवाहिका आल्यानंतर त्या तरुणीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला कळव्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रेल्वेतून पडून अपघातग्रस्त झालेल्या प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असताना देखील अंबरनाथ रेल्वे स्थानकात अशी वैद्यकीय सुविधा तत्काळ पुरवण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. उपचाराची गरज असताना देखील अर्धा तास या तरुणीला प्लॅटफॉर्मवरच ठेवण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून अवघ्या 200 मीटरच्या अंतरावर शासनाचे उपजिल्हा रुग्णालय असताना देखील त्या रुग्णालयात या तरुणीला उपचारासाठी दाखल केले नाही. रेल्वेची स्वतंत्र कोणतीही रुग्णवाहिका सेवा नसल्यामुळे ते स्थानिक प्रशासनावरच अवलंबून राहत आहेत. त्यामुळे ॲम्बुलन्सला विलंब होत असताना या तरुणीला रुग्णालयात तत्काळ स्टेशन हमालची मदत घेऊन हलवणे गरजेचे होते.