स्नेहा पावसकरठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘हिंदी भाषिक भवन’ प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ठाण्याचे युवा साहित्यिक आगरी बॉय सर्वेश तरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट ‘आगरी’ बोलीत पत्र लिहीत अन्य भाषिकांच्या तुलनेत आगरी-कोळी बांधवांवर आणि मराठी भाषिकांवर अन्याय का होत आहे? दादा हे असे का? (दादूस या असा कला...) अशी विचारणा केली आहे. तर, हे हिंदी भाषिक भवन रद्द केले नाही तर स्थानिक भूमिपुत्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सर्वेश तरे हे ठाण्यातील युवा साहित्यिक असून ते आगरी भाषा बोलावी-टिकावी, या हेतूने कायम प्रयत्नशील असतात. आगरीत कथा, लेख, कविता, रॅप लिहिण्यावर ते भर देतात. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सर्वेश यांनी थेट आगरीतूनच पत्र लिहिले आहे. मीरा-भाईंदर येथे स्थानिक भूमिपुत्र असलेले आगरी कोळी बांधव २००७ पासून ‘आगरी भवनाची’ मागणी करत आहेत. परंतु, अजून वास्तू उदयास आली नाही. किंबहुना, आगरी भवनासाठी स्थानिक संस्थेला वादग्रस्त जागा तसेच ‘सांस्कृतिक भवन’ भाडेतत्त्वावर देणार आहेत. तर, ‘हिंदी भाषा भवनास’ सरकारकडून एक कोटी आणि शिवसेना खासदार-आमदार निधीतून ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, आगरी-कोळी मूळ भाषा असताना तिच्या जतन-संवर्धनासाठी एकही रुपया न संपवता ‘हिंदी भाषिकांसाठी’ होणारे भवन हा भूमिपुत्रांचा अपमान असल्याचे तरे यांनी पत्रात म्हटले आहे. सोबतच तरे आणि स्थानिक भूमिपुत्रांंच्या संस्था २०१२ पासून आगरी भवनासाठी ठाणे महानगरपालिकेत मागणी करत होते. २०१९ ला आगरी-कोळी भवनाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फक्त भूमिपूजन झाले. मात्र, अजूनही वास्तू उभारलेली नाही, असे पत्रात म्हटले आहे. मराठी भाषेसाठी काम करणारी अनेक मंडळे हे आपले कार्यालय ‘भाडेतत्त्वावर’ चालवतात. मात्र, राज्यात एकही ‘मराठी भवन’ नाही. मात्र, हिंदी भाषिक भवनासाठी सरकार आग्रहाने पुढाकार घेत आहे, (हिंदी भाषिक भवनाला अवरा गडगंज निधी जाहीर केला यो आमचे भूमिपुत्रांचा अपमान हं.) अशी खंतही त्यांनी पत्रात मांडली आहे.भूमिपुत्रांंना गृहीत धरून त्यांचे ‘रेती, शेती, मासेमारी, वीटभट्टी’ हे पारंपरिक व्यवसाय नष्ट केले आणि आता स्थानिकांच्या जागेवर असणाऱ्या आरक्षित भूखंडावर परप्रांतीयांसाठी सुविधा होणार असतील, तर भूमिपुत्र गप्प बसणार नाही. हिंदी भाषिक भवन सरकारने रद्द करावे, अन्यथा स्थानिक भूमिपुत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करतील (आगरी-कोळ्यांबद्दल ना भूमिपुत्रांबद्दल जुरूकसा तरी पीरेम असल तं पयले आपले बोलीसाठी सुविधा राजाश्रय मिलवून द्यास, ना यो हिंदी भाषिक भवन भूमिपुत्रांचा राग रस्त्यावं दिसन्याचे आदी रद्द करा) असाही इशारा तरेंनी दिला आहे. मराठी एकीकरण समितीनेही या भवनाला विरोध दर्शवला आहे.
उद्धव ठाकरेंना दादूस हाक का?‘उद्धव ठाकरे यांची कुलदेवता एकवीरा आई, आनं आमचे आगरी-कोळ्यांची पुन आई एकवीरा. म्हणून आपून येके कुटुंबानचं, ये हिशोबी दादूस ही हाक...’ असे तरे यांनी पत्राच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.