ठाणे: वुई आर फॉर यु आणि नौपाडा युथ यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला माणूस या मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर बाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्य्क वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
करोना काळात गेल्या दीड दोन वर्षात स्मशानभूमीतील सर्वच बांधवांनी जीवावरचे संकट असून न डगमगता आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यांच्या या कर्तव्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून' आपला माणूस' मोहिमेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे किट जवाहरभाग स्मशान भूमीतील बांधवांना वुई आर फॉर यू आणि नौपाडा यूथच्या वतीने देण्यात आले.
यावेळी वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली वुई आर फॉर यूचे सेवेकरी विजय डावरे, महेश सुतार, ऋषिकेश केदार, अशोक कदम, रघुनाथ रसाळ, पांडुरंग पाटील, नौपाडा युथ चे गजानन परब, अक्षय जोशी, आदित्य जाधव, अभिजित जाधव, अद्वैत मुळे आदी सहभागी झाले होते.
माणूस मरण पावल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार झाले की त्याला मुक्ती मिळते, असे बोलले जाते. त्यासाठी अनेक मंडळीही रात्रंदिवस बॉर्डरवरील सैनिकांसारखेच स्मशानभूमीत कार्यरत असतात. या मंडळींनी कोरोना काळात ऍम्ब्युलन्स चालक, मृतदेह रॅप करणे, अग्निसंस्कार करणे, अस्थी व्यवस्थित ठेवणे यासारखी विविध कामे चोखपणे केली. हे काम करण्यासाठी खूप मोठे जिगर लागते. त्यामुळे वुई आर फॉर यू आणि नौपाडा युथच्या माध्यमातून ७५ वा स्वातंत्र्यदिन 'जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून खारीचा वाटा उचलण्यात आला. ''ही मंडळी खूप मनापासून आपले कर्तव्य बजावत असतात . कुणाच्या आईसाठी, कुणाच्या वडिलांसाठी ही सर्व मंडळी सतत कार्यरत असतात. खरेतर ही मदत नाही. हे कर्तव्य आहे. भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत'', अशा भावना या वेळी वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांनी व्यक्त केली.
वुई आर फॉर यू संस्थेच्या 'आपला माणूस' या मोहिमेअंतर्गत समाजातील दुर्लक्षित परंतू समाजकार्य करणाऱ्या घटकांना सहकार्य केले जाणार आहे. त्याची सुरुवात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून करण्यात आली.