लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्या वाढदिवसाचा केक टोकदार गुप्तीने कापणाºया देवेंद्र कदम (२१, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या तरुणाला चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून ही गुप्तीही हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत ही कारवाई केली आहे.ठाण्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केला आहे. याच मनाई आदेशानुसार कोणालाही एखादे हत्यार बाळगणे किंवा विक्री करण्याची मनाई आहे. असे असूनही ८ जून २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धर्मवीरनगर येथील इमारत क्रमांक २३ च्या बाजूला असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर देवेंद्र याने त्याच्या मित्रांसह गुप्तीने वाढदिवसाचा केक कापला. या संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाली होती. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ आणि उपनिरीक्षक डी. सी. केदार यांच्या पथकाने १२ जून रोजी रात्री कथित आरोपीचा शोध घेऊन मनाई आदेशाचा भंग केल्याच्या तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलमाखाली अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* सोशल मिडियात क्लिप टाकणे पडले महागात..यातील देवेंद्र कदम याने गुप्तीने केक कापल्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता. हीच क्लिप व्हॉटसअॅपद्वारे व्हायरल केली. तसेच स्वत:च्या व्हॉटसअॅप स्टेटसलाही हीच क्लिप ठेवली. याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांमध्ये जात असल्याने पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.