ठाणे : बिबट्याचे कातडे १० लाखांस विक्रीसाठी आलेल्या अहमदनगर, राहुरी, कोळेवाडी येथील दिलीप लुमाजी वायळ (३०) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ ने शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून कातडे जप्त केले असून १४ दिवसांची कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.कळवा, पारसिक सर्कल येथे एक जण बिबट्याचे कातडे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी सापळा रचून दिलीपला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तापसणी केल्यावर त्यामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले. चौकशी केल्यावर ते कातडे १० लाखांना विकण्यासाठी ठाण्यात आणल्याची माहिती त्याने दिली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम-९, ३९, ४८ (अ), ४९, ५१ याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
बिबट्याचे कातडे विक्रीप्रकरणी तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 4:42 AM