मीरा रोड : राज्य शासनाने कोरोना उपचारांसाठी रुग्णालयातील दर निश्चित केलेले असताना अनेक खासगी रुग्णालये मनमानी शुल्क वसुली करत असल्याने याविरोधात मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी सहायता मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक रुग्णांची हजारो रुपयांची बिले कमी होऊन मोठा दिलासा मिळाला आहे.
मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे आणि ओवळा - माजिवडा १४६ चे अध्यक्ष कुणालादित्य काटकर या दोघा तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्याकडून खासगी रुग्णालये मनमानी वसुली करीत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षीसून सुरू आहेत. शासनाने खासगी रुग्णालयाच्या लुटीला आळा घालण्यासाठी उपचारांचे दर निश्चित केले आहेत. महापालिकेनेसुद्धा बिलांचे ऑडिट सुरू केले आहे. तरीही खासगी रुग्णालयांकडून लूट काही थांबलेली नाही.
रुग्णांकडून जास्त देयक आकारले असेल तर शासन दरानुसार त्याची पडताळणी करायला लावून देयकाचे पैसे कमी करण्यासाठी काकडे व काटकर यांनी मोहीम सुरू केली. बिलाची रक्कम जास्त वाटल्यास अडचणीतील रुग्णांच्या नातलगांना त्यांनी संपर्कासाठी ई-मेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक दिले.प्रदेश काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही मोहीम सुरू केली. काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण व नातलगांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन जास्त बिल तयार करतात आणि त्याची वसुली सक्तीने करत असल्याच्या असंख्य तक्रारी येत होत्या, असे काकडे म्हणाले.
nमीरा रोडच्या पद्माकर म्हात्रे रुग्णालयाने एका रुग्णास आकारलेले जास्तीचे तब्बल दीड लाख रुपये शासन दरानुसार आढावा घेऊन कमी करायला लावले. श्री परमहंस रुग्णालयाविरोधात जास्त दराकरिता गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. nरिद्धीसिद्धी रुग्णालयाने जास्त आकारलेले ५२ हजार ४१० रुपये तर फॅमिली केअर रुग्णालयाने जास्त आकारलेले १६ हजार ७२५ रुपये कमी करून दिल्याचे काटकर यांनी सांगितले .nशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना शुल्क आकारल्यास रुग्णालयांचे नाव खराब होणार नाही आणि रुग्ण व नातलगांना दिलासा मिळेल.