भिवंडी: ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत झेंडा मिरवितांना लोखंडी दांडी असलेला झेंडा थेट विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने शॉकलागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील पिराणी पाडा परिसरात शुक्रवारी घडली आहे.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अश्फाक शेख वय २१ वर्ष असे विद्युत वाहिनीचा शॉकलागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.अश्फाक हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून काही दिवसांपूर्वी भिवंडीत येऊन टेलरिंगचे काम करत होता.शुक्रवारी ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत आपल्या मित्रांसोबत सहभागी झाला होता.या मिरवणुकीत त्याने २० ते २५ फूट उंच लोखंडी रॉड असलेला झेंडा हातात धरला होता.यावेळी त्याच्या झेंड्याचा संपर्क विद्युत वाहिनीशी आल्याने शॉक लागल्याने अश्फाकचा जागीच मृत्यू झाला.
ईद ए मिलाद निमित्त शहरात रझा अकादमी भिवंडी आणि ईद मिलाद ट्रस्ट यांच्या वतीने १९ वी वार्षिक मिरवणूक मोठ्या थाटामाटात कोटर गेट येथून काढण्यात आली.या मिरवणुकीची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली होती.या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते.