सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, श्रीराम चौकात नवरात्री निमित्त लावण्यात आलेले बॅनर्स काढताना एका २५ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असलीतरी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका हद्दीत शेकडो पोस्टर्स, बॅनर्स व रस्त्यावर कमानी उभारण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश कमानी, पोस्टर्स व बॅनर्स विनापरवाना लावल्याचे बोलले जात आहे. अशीच भली मोठी कमान श्रीराम चौक परिसरात एका राजकीय नेत्यांच्या नावाने लावण्यात आली होती. रस्त्याच्या कमानीवरील पोस्टर्स व बॅनर्स काढतांना कल्याण पूर्व चिंचपाडा येथे राहणाऱ्या २५ वर्षीय सोहल अनिल भिंगारदिवे याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली असून सोहलचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असलेतरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
शहरात पोस्टर्स व बॅनर्स परवानगी प्रकरण ऐरणीवर आल्यानंतर, महापालिकेने ३ महिन्यांपूर्वी फक्त ६८ पोस्टर्स- बॅनर्सला अधिकृत परवानगी दिल्याचे सांगितले होते. याव्यतिरिक्त असलेले पोस्टर्स व बॅनर्स अवैध व विनापरवाना असून त्यावर प्रभाग समिती निहाय्य कारवाई सुरू केली होती. मात्र ३ ते ४ गुन्हे दाखल केल्यावर पोस्टर्स, बॅनर्स कारवाई बंद पडली. आजही विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स व कमानीची संख्या लक्षणीय असून प्रभाग समिती त्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.