- स्नेहा पावसकर ठाणे : शहराला व येथील अनेक वास्तूंना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यातील अनेक वास्तूंची कालौघात पडझड झाली असली तरी त्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि ही माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आता ठाण्यातील तरूणाईने पुढाकार घेतला आहे. शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे महिन्यातून एकदा ठाणे हेरिटेज वॉक असतो, त्यातून ठाण्यातील प्राचीन इतिहास असलेल्या वास्तूंची अभ्यासपूर्ण माहिती ठाणेकरांनी दिली जाते.ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून प्रसिद्धआहे. शिलाहार घराण्याची राजधानी म्हणूनही ठाणे शहर ज्ञात आहे. शिलाहारांच्या राजवटीपासून ते अगदी मराठा राजवटीपर्यंतचे वैभव प्राप्त झालेल्या ठाणे शहरात मंदिरे, किल्ले, तोफा, काही ब्रिटिशकालीन कार्यालये अशा विविध पुरातन वास्तू आहेत. या सर्व वास्तूंची माहिती अनेक पुस्तकातून, कार्यक्रमातून आपण ऐकली असेल. पण ही माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्या वास्तूंची सद्यस्थिती स्वत: पाहावी यासाठी ठाण्याच्या शिवगर्जना प्रतिष्ठानच्या तरूण वर्गाने ‘हेरिटेज वॉक’ नामक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्यांसोबत महिन्यातून एखाद्या रविवारी दोन तास ठरलेल्या ठिकाणी फिरवून दोन ते तीन वास्तूंचा सखोल इतिहास सांगितला जातो. तसेच त्या वास्तूंचे जतन करण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील यावर चर्चा केली जाते. आतापर्यंत प्रतिष्ठानच्यावतीने चार हेरिटेज वॉक झालेले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयोजकांना विशेषत: युवकांचा प्रतिसाद अपेक्षित आहे. नवीन वर्षातला पहिला हेरिटेज वॉक हा रविवारी होणार आहे.नाशिक, पुणे या शहरात अशाप्रकारचे हेरिटेज वॉक आयोजित केले जातात आणि त्याला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ठाण्यातही यापूर्वी इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी अशाच प्रकारचा उपक्रम राबवला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता आम्ही तरूणांनी पुन्हा नव्याने ठाण्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.- प्रणय शेलार,अध्यक्ष, शिवगर्जना प्रतिष्ठान
वारसा जपण्यासाठी तरूणांचा हेरिटेज वॉक; शिवगर्जना प्रतिष्ठानचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:33 AM