ठाणे : घोडबंदर रोडवरील एका युवकास युवा सेनेच्या एका पदाधिका-यासह त्याच्या मित्रांनी शनिवारी उशिरा रात्री जबर मारहाण केली. हिरानंदानी मिडोजमधील हॉटेल लॉन्ज 18 मध्ये ही घटना घडली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून, चितळसर पोलिसांनी याप्रकरणी रविवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.घोडबंदर रोडवरील विजय रेसिडेन्सीचे रहिवासी प्रतीक विश्वनाथ भंडारे (वय 25) यांच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री लॉन्ज 18 मध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेलमध्ये दोन टेबलावर प्रतीक भंडारे आणि त्यांचे मित्र जेवणासाठी बसले होते. जवळच असलेल्या दुस-या एका टेबलावर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघांचा युवा सेनेचा उपनिरीक्षक ईशान बलबले त्याच्या मित्रंसोबत बसला होता. जेवण झाल्यानंतर प्रतिकचा मित्र रोनित हात धुण्यासाठी बेसिनकडे जात असताना ईशान बलबलेला त्याचा धक्का लागला. त्यामुळे ईशानने रोनितला शिवीगाळ करून माफी मागण्यास सांगितले. हा वाद इथेच संपला.थोड्या वेळाने प्रतीक भंडारे यांच्या मोबाईल फोनवर मित्राचा कॉल आला. हॉटेलमधील गोंधळामुळे आवाज येत नसल्याने मित्राशी बोलण्यासाठी प्रतीक भंडारे हॉटेलबाहेर आले. तिथे ईशान बलबले, जुबेर आणि त्यांच्या मित्रांनी प्रतीक भंडारे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. लोखंडी सळईने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर आरोपींनी गुप्तांगावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप प्रतीक यांनी केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला आधी शासकीय रूग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. जखमीचा हॉस्पिटलमधून जबाब घेतल्यानंतर रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.युवा सेना जखमीच्या पाठीशी - पूर्वेश सरनाईकप्रतीक भंडारे यांना ईशान बलबलेने जबर मारहाण केल्यामुळे ही युवा सेनेच्या कारभारावर गंभीर आरोप होत असताना आपली संघटना जखमीच्या पाठीशी असल्याचे युवा सेनेचे ठाणे शहराध्यक्ष तथा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केले. सरनाईक यांनी जखमीची विचारपूस करून त्याला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. हा प्रकार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आला आहे. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर याप्रकरणी पक्षस्तरावरून कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ईशान बलबले हा युवा सेनेचा पदाधिकारी असून, ठाण्यातील रेनबो इंटरनॅशल स्कूलच्या संचालक मंडळामध्येही आहे.
युवासेना पदाधिका-याची तरुणास जबर मारहाण, पक्षस्तरावर कारवाई करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 8:34 PM