अंबरनाथ: संविधान गौरव दिनानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवलेअंबरनाथमध्ये आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आठवले स्टेजवरून उतरत असताना एका तरुणाने यांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यकर्तेदेखील भांबावले. मात्र आठवले यांना सावरल्यावर कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. अंबरनाथ पोलिसांनी हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी आज अंबरनाथ बंदची हाक दिली आहे.
अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती. रात्री दहा वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर आठवले कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत स्टेजवरून खाली येत असताना एक तरूण त्यांच्या अंगावर धावला आणि त्याने आठवलेंच्या कानाखाली लगावली. या प्रकारानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या निषेधार्थ या तरुणाने आठवलेंवर हात उगारला असल्याचे बोलले जात आहे.