ठाणे : सिनेअभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या मुंबईतील जुहू येथील घरात शिरून ४ वर्षांपूर्वी २६ लाखांची लूट करून पळालेल्यांपैकी पिंटू निशाद (२६, रा. चिंचवड, पुणे) आणि त्रिवेणी उर्फ महेश निशाद (३३, रा. लिंक रोड, मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून ठाण्यातील एका चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली.ठाण्याच्या वसंत विहार सर्कल परिसरात घरफोडी करणारे चोरटे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली रणावरे यांच्यासह उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने पिंटू आणि त्रिवेणी या दोघांना वसंत विहार भागातून १७ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून १२ इंच लांबीची कटावणी आणि १३ इंचाचा स्क्रू ड्रायव्हर हस्तगत केला.त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी लोकमान्यनगर पाडा क्रमांक ३ येथील पांडे चाळीतील देवीदास काळे यांच्याकडे ४ आॅक्टोबर २०१७ रोजी केलेल्या एका चोरीचीही कबुली दिली. यात त्यांनी तीन तोळे सोन्याचा ऐवज चोरला होता. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चोरीची तक्रार दाखल झाली होती. या चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या घरी चोरी करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:03 AM