ठाणे : महाराष्ट्रातील १४ ठिकाणचे शून्य सावलीचे दिवस असणार आहे. (१) रत्नागिरी ११ मे (२) सातारा, सोलापूर १२ मे (३) उस्मानाबाद १३ मे (४) रायगड, पुणे, लातूर १४ मे, (५) अंबेजोगाई, केज १५ मे (६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे (७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण , पैठण १७ मे (८)संभाजीनगर , जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे (९) नाशिक, वाशीम, गडचिरोली २० मे (१०) बुलढाणा, यवतमाळ २१ मे (११) वर्धा २२ मे (१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे (१३) भुसावळ , जळगांव, नागपूर २४ मे (१४) नंदुरबार २५ मे या दिवशी शून्य सावली योग आहे. मुंबईत ही वेळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांची आहे. त्यावेळी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली.
आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हटले जाते. आज आपण या शून्य सावलीचे रहस्य जाणून घेणार आहोत. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आकाशात आपल्या डोक्यावर आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. शून्य सावलीच्या दिवशी दुपारी आकाशात सूर्य ठीक डोक्यावर आल्यावर उन्हात उभे राहून सर्वांनी आपली सावली अदृश्य कशी होते याचा नक्कीच अनुभव घ्यावा असे सोमण यांनी सांगितले.