भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. या उमेदवारीचा विरोधक पक्षांनी चांगलाच धसका घेतला आहे.शहरातील यंत्रमाग कारभार ग्रामिण भागातही पसरू लागल्याने त्यासाठी लागणारे कामगार देखील ग्रामीण भागात स्थायिक झाले आहेत. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले असून खोणी व काटई ग्रामपंचायतीवर नेहमी समाजवादीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे या वेळी समाजवादी पार्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपले नशीब आजमविणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खाडीपार, काटई, कांबा, कारिवली, पडघा, बोरिवली या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. समाजवादी पक्षांत अद्याप ग्रामीण अथवा तालुका प्रमुखाची नेमणूक केलली नाही, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सपाचे शहर जिल्हाध्यक्ष शानेरब खान व उपाध्यक्ष आरफात शेख यांनी महानगरपालिकेत समाजवादीचे वर्चस्व कमी झाल्याने ग्रामीणमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना पक्षाचे सायकल हे चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक अधिका-यांना लेखी पत्र दिले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच समाजवादी पक्ष उतरत असल्याने इतर राजकीय पुढा-यांना धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवारीने काँग्रेस व राकाँपा उमेदवारांना फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.
समाजवादी पार्टी लढणार जिल्हा परिषद व पंचायत समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 8:55 PM