ठाणे : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन वेळेवर होणे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणे, विनंती बदलीची तीन वर्षांची अट शिथिल करून ती एक वर्ष करणे, ग्रेड-पेमध्ये सुधारणा करणे, वर्ग ४ मधून कनिष्ठ सहाय्यक ५० : ४० : १० नुसार भरणे, परीक्षेत सूट देण्याबाबत पूर्ववत वयोमर्यादा ४५ची ठेवणे, एमडीएस व लेखा कर्मचारी वर्ग दोनची पदोन्नती कोट्याचे प्रमाण वाढविणे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत पेन्शन लागू करणे, आगाऊ वेतनवाढ पुन्हा पूर्ववत सुरू करणे या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी लवकरच घंटानाद आंदोलन छेडणार आहेत. यानंतरही लक्ष केंद्रित न केल्यास ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनापासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
हा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य जिल्हा परिषद सर्व संवर्गीय संघटनेचे ज्येष्ठ नेते बलराज मगर यांनी सर्व उपस्थितांशी चर्चा करून घोषित केल्याचे राज्य संपर्क सचिव रामचंद्र मडके यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय ऑनलाइन सभेत ठाणे जिल्ह्यातून गजानन विशे, जगदीश मिरकुटे, राजन जगे, दिलीप आठवले, स्नेहा राणे व अपर्णा देशमुख आदींची उपस्थिती होती.