पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी या जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये विनामास्क गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांना २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी त्यांना मास्क देऊन दंड वसूल केला.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ५३८ इतकी असून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २९ हजार ९९५ तर जिल्ह्यातील अन्य ८ तालुक्यांतील ग्रामीण भागात १५ हजार ५४३ इतकी होती. यापैकी ४४ हजार १२३ रुग्ण पूर्णतः बरे झाले असून २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, गर्दी टाळणे अशा हलगर्जीपणाच्या प्रवृत्ती पुन्हा वाढू लागल्याने रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विचार करू लागले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अध्यक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या.
कर्मचाऱ्यांची तारांबळजि.प. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २०० रुपये दंड ठोठावला. या वेळी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी उपस्थित अध्यक्षा कामडी यांना मास्क दिला. या कारवाईमुळे जिल्हा कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.