ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी स्थापन होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर काहीही झाले तरी झेंडा फडकावण्यासाठी आसुसलेल्या शिवसेनेची सोमवारी कसोटी लागणार असून राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहण्यावरच या निवडणुकीची सारी गणिते अवलंबून आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीला न मागता उपसभापतीपद देऊन शिवसेनेने मोठी किंमत चुकवली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने केलेल्या महायुतीनंतर निकाल जरी विरोधात गेला असला, तरी सभापतीपद मिळेपर्यंत भाजपाने जंग जंग पछाडत शिवसेनेची जमेल तेवढी कोंडी करत त्याचे उट्टे काढल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी, १५ जानेवारीला होणार असून त्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेचे सदस्य थेट महाबळेश्वरहून तर भाजपाचे सदस्य गोव्याहून येणार आहेत. अध्यक्षपद शिवसेनेच्या शहापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मंजुषा जाधव यांना, तर राष्टÑवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार यांना उपाध्यक्षपद मिळेल, असे मानले जाते. त्यामुळे आदिवासी आणि कुणबी अशा दोन्ही समाजांना सत्तेत स्थान मिळेल. भिवंडीने भाजपाला जसा हात दिला, तसाच शिवसेनेलाही दिला. त्यामुळे त्या तालुक्यालाही चांगले पद मिळावे, अशी तयारी सुरू आहे. बाळ्यामामा यांना गटनेतेपद देत शिवसेनेने ती कसर अधीच भरून काढली आहे.अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड नियोजन भवनात पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील. दुपारी ४.३० पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर तासाभरात ही निवड पार पडेल.ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांपैकी शिवसेनेचे २५ सदस्य आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या १० सदस्यांचा पाठिंबा मिळाला, की सत्तेचे गणित सोपे होईल. त्यासाठी अध्यक्षपद शिवसेनेकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे अशी विभागणी आहे.राष्ट्रवादीला अध्यक्षपदासह अन्य काही समित्या देण्याची तयारी दाखवत भाजपाने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेनेनेही शहापुरात राष्ट्रवादीशी मिळतेजुळते घेतले. तसेच त्यांना आणखी काही समित्या देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे.भाजपाच्या फोडाफोडीच्या काळात काँग्रेसच्या एकमेव सदस्याला महत्त्व आले होते. पण राष्ट्रवादीशी तडजोड केल्याने त्या सदस्याची भूमिका पूर्वीइतकी निर्णायक ठरणार नाही. अर्थात तो सदस्य भाजपासोबत जाणार नाही, असे वरिष्ठ नेते सांगत असल्याने शिवसेनेसाठी हा दिलासा मानला जातो.आपले १६ सदस्य, एक पुरस्कृत अपक्ष आणि काँग्रेसचा एक सदस्य अशा १८ सदस्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या १० सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपाने थांबवल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना गळ घालून हे प्रयत्न सुरू होते.शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दोन मतांची गरज होती आणि भिवंडीतील नेते तसे जाहीरपणे सांगत होते. मुरबाडमधील राष्ट्रवादीचे सदस्य भाजपासोबत जाण्यास नाखूश होते. शिवाय उपसभापतीपद दिल्याने शहापुरातील पाचही सदस्यांची मते मिळतील अशी बेगमी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे भाजपाने आपले प्रयत्न आवरते घेतल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक , शिवसेनेची आज कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:47 AM