- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. भाजप दोन्ही पदांसाठी उमेदवार देऊन बिनविरोध होणाऱ्या या निवडीला खीळ घालणार आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या भिवंडी व अंबरनाथ येथील सदस्यांमध्ये स्पर्धा आहे.अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिला उमेदवारांसाठी राखीव आहे. ५३ सदस्यांपैकी सर्वाधिक २६ सदस्य शिवसेनेकडे आहेत. या प्रवर्गाच्या महिलाही आहेत. सर्वांना संधी देण्याच्या दृष्टीने शिवसेनेने वेळोवेळी खांदेपालट करून सभापतीपदाची संधी सर्वाधिक महिलांनाच दिली. तरीही अध्यक्षपदावर मतभेद असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपस टक्कर देण्यासाठी योग्य महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे नियोजन झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांच्या या खेळीस अनुसरून दिलेल्या उमेदवाराविरोधात शिवसेनेतून अर्ज दाखल होणार नाही. या पदासाठी सेनेच्या भिवंडी व अंबरनाथच्या सदस्यांमध्ये स्पर्धा असल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवसेना, भाजपचे विळा-भोपळ्याचे नाते पाहता या निवडीसाठी भाजप उमेदवार देऊन ही निवड चुरशीची करणार आहे. १६ सदस्य असलेला भाजप या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. भाजपला एक सभापतीपद देऊन शिवसेनेने विरोधी पक्ष संपुष्टात आणलेला असला तरी या वेळी तो डोके वर काढणार आहे. यात राष्ट्रवादी दोन सदस्यांच्या बळावर सभापतीपदाच्या अपेक्षेत आहे. अडीच वर्षांपूर्वी ठरलेल्या फॉर्मुल्यास अनुसरून उपाध्यक्षपदाची मागणी करणारे खंबीर नेतृत्व राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे कदाचित त्यांना विषय समिती सभापतीपदावर समाधान मानावे लागणार आहे. पण प्रसंगी उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे समजते. याशिवाय एकूणच राजकीय गणिते पाहता, सेनेच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळणार : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ठाण्यातील एनकेटी सभागृहात ही निवडणूक पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेत जि.प.च्या ५३ सदस्यांना सहभागी होता येणार आहे. या सदस्यांना हात वर करून मतदान करावे लागणार आहे. सकाळी ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. सभागृहाचे कामकाज दुपारी ३ वा. सुरू होईल. अर्जांची छाननी करून उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाईल.
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:33 AM