लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनसह सर्व संवर्गीय संघटनेची राज्यस्तरीय ऑनलाइन सभा शनिवारी कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. प्रशासनाला त्याची जाणीव करून देण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाणे जिल्हा परिषदेसह राज्यातील अन्यही जिल्हा परिषदेत घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे येथील कर्मचारी युनियनचे मंत्रालयीन संपर्क सचिव चंद्रकांत मडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन वेळेवर होणे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणे, विनंती बदलीची तीन वर्षांची अट शिथिल करून ती एक वर्ष करणे, ग्रेड-पेमध्ये सुधारणा करणे, वर्ग ४ मधून कनिष्ठ सहायक ५० : ४० : १० नुसार भरणे, परीक्षेत सूट देण्याबाबत पूर्ववत वयोमर्यादा ४५ ची ठेवणे, एमडीएस व लेखा कर्मचारी वर्ग दोनची पदोन्नती कोट्याचे प्रमाण वाढविणे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत पेन्शन लागू करणे, आगाऊ वेतनवाढ पुन्हा पूर्ववत सुरू करणे आदी मागण्या सरकारने तात्काळ मार्गी लावाव्यात, यासाठी घंटानाद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. मात्र, सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केल्यास ९ ऑगस्ट या क्रांतिदिनापासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे मडके यांनी सांगितले.
या बैठकीत ज्येष्ठ नेते बाबूराव पुजरवाड, सरचिटणीस विवेक लिंगराज, संपर्क सचिव रामचंद्र मडके, राज्य संपर्कप्रमुख बजरंग सकपाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे गजानन विशे, जगदीश मिरकुटे, राजन जगे, दिलीप आठवले, स्नेहा राणे व अपर्णा देशमुख आदींचा सहभाग होता. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता एक दिवसीय घंटानाद आंदोलनापाठोपाठ बेमुदत संपाची तयारी कर्मचाऱ्यांनी सुरू केल्याचे मडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---------------