ठाणे : जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत, तर उर्वरित २६७ शाळांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शाळा बंद व काहींचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावरून गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान गावकºयांकडून जाब विचारला जाणार आहे.जि.प. व पं.स.च्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचार रंगात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून सुरू झाल्या. याविषयी ‘जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वाºयावर’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघडकीस आणला. त्यास अनुसरून आक्रमक झालेल्या गावकºयांनी अंबरनाथसह शहापूर तालुक्यातील नागरिकांनीही जि.प. प्रशासनाला धारेवर धरले. त्याची वेळीच दखल घेत शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांचे सर्वेक्षण केले. त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे. यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ४४ शाळांचा शोध घेऊन त्या बंद होणार आहे. २६७ शाळांचे अन्यत्र स्थलांतरण होणार आहे. या शाळाबंदचे संकट तूर्तास टळले असले, तरी स्थलांतर म्हणजेच संबंधित गावातील शाळा गावकºयांसाठी बंद होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचारकांना या शाळांच्या मुद्यावर गावकºयांकडून जाब विचारला जाणार आहे.
जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:52 PM