तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.