शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.