सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.