(Image Credit: Piiholo Ranch Zipline)
मुंबई : विकेंड असो वा उन्हाळ्याची सुट्टी सर्वांनाच धकाकीच्या जीवनापासून थोडावेळ का होईना बाहेर कुठेतरी जायचं असतं. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना कंटाळा आलेला असतो. त्यामुळे ते लोक वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. अशांसाठीच आम्ही मुंबईच्या आसपास किंवा एका दिवसाच्या प्रवासात फिरता येईल, अशा काही खास डेस्टिनेशनची माहिती घेऊन आलो आहोत.
1) नदीच्या पात्रात उड्या मारण्याचा आनंद
मुंबईत भलेही समुद्रात तुम्ही अनेकदा भीजले असाल पण नदीच्या मोठ्या पात्रात धावत येऊन उडी घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कोलाडमधील कुंदालिनी नदीवर तुम्ही हा मनसोक्त आनंद घेऊ शकता. इथे तुम्ही रिव्हर राफ्टींगही करु शकता. नदीच्या पाण्यात उडी मारण्याच्या आनंदासोबतच तुम्हाला इथे खास गावरान पद्धतीच्या जेवणाचा आनंदही घेता येईल.
रिव्हर राफ्टींगसाठी खर्च : 1400 रुपये एका व्यक्तीसाठी
राहण्याचा खर्च : 2500 रुपये
ठिकाण : कोलाड, 117 किमी
2) चमचमत्या ताऱ्यांखाली कॅम्पिंग
कुठेही फिरायला गेल्यावर सगळेच लोक बहुदा हॉटेल रुममध्ये राहतात. पण मोकळ्या आकाशाखाली शुभ्र ताऱ्यांच्या सानिध्यात वेळ घालवण्याची मजा काही वेगळी असते. असाच काहीसा अद्भभूत अनुभव तुम्ही मुंबई जवळील अलिबाग, लोणावळा आणि काशिद येथे घेऊ शकता. विचार करा लख्ख ताऱ्यांचा प्रकाश आणि तुमच्या समोर मस्त बारबेक्यू, मजा येईल ना?
खर्च : 2500 रुपये एका रात्रीसाठीठिकाण : अलिबाग 108 किमी, लोणावळा 82 किमी आणि काशिद 135 किमी.
3) फिशिंग, मजा-मस्ती
अनेक ठिकाणी तुम्ही फिरायला जात असाल पण नदीच्या किंवा तलावाच्या काठावर बसून तुम्ही फिशिंग कधी केली नसेल. इच्छा असूनही अनेकदा ही गोष्ट करायला मिळत नाही. मग ते मनात कुठेतरी राहून जातं. पण तुमची हीच इच्छा तुम्ही नेरळमध्ये पूर्ण करु शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला फिशिंगसाठी लागणारं साहित्यही रेन्टने मिळतं. स्वत: पकडलेले मासे तिथेच तयार करुन खाण्याचा जो आनंद तुम्हाला मिळेल त्याला तोड नाही.
खर्च : फिशिंगसाठीचं साहित्य रेन्टने घेण्यासाठी तुम्हाला 1 हजार रुपये खर्च येईल. ठिकाण : नेरळ, मुंबईपासून 74 किमी.
4) झिपलींगचा थरारक अनुभव
काही लोकांना थरारक, साहसी काहीतरी करायचं असतं. दोन डोंगरांच्या मधून खळखळत वाहणारी नदी आणि त्यावरुन एका दोरीच्या मदतीने तुम्ही एका बाजूकडून दुसरीकडे जाताय. असं करायला आवडणारी काही लोकं असतातच. एकदा तरी या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असतो. हाच अनुभव तुम्ही मुंबईजवळ घेऊ शकता. याला झिपलींग असं बोललं जातं.
झिंपलींग खर्च : 800 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठीठिकाण : कोलाड 117 किमी, डेला अॅडव्हेंचर पार्क 99 किमी, अॅंबी व्हॅली 106 किमी.
5) मोरांची चिंचोली
अलिकडे मोर आता केवळ टीव्हीवरच बघायला मिळतात. ग्रामीण भागात भलेही जंगलात कधीकाळी मोर बघायला मिळत असतील पण शहरात तर हे कठिणच आहे. पण मुंबईजवळच तुम्ही जितके हवे तितके, अगदी जवळून मोर बघू शकाल तर तुम्हाला आनंद होईल. मोराची चिंचोली नावाने प्रसिद्ध या गावात तुम्ही 2500 पेक्षा जास्त मोर जवळून बघू शकता.
खर्च : इथे एक रात्र थांबण्यासाठी 500 रुपये ठिकाण : मोराची चिंचोली, जिल्हा पुणे, मुंबईपासून 186 किमी.