उन्हाळा म्हटलं की, कॉलेज-शाळांना सुट्टी याला लागून मुलांची पालके सुद्धा सुट्टी घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. उन्हाळा अजून पूर्णपणे आग ओकायला सुरूवात झाली नसली तरी उन्हाळ्याच्या ट्रिपचं प्लॅनिंग आधीच केलं जात तुमचंच काम सोपं होईल. नेहमीच लोक मुंबई, गोवा, मनाली, महाबळेश्वर, चिखलदरा इत्यादी नेहमीच्या ठिकाणांवर भेटी देतात. पण तुम्ही जर या ठिकाणांवर जाऊन कंटाळले असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.
तवांग (अरूणाचल प्रदेश)
तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल तर या उन्हाळ्यात तवांगला तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता. हे ठिकाण फार शांत असून शांत वाहणारे झरे, उंच उंच धबधबे, डोंगरदर्या, हिरवागार परिसर आणि बौध्द मठे ही तवांगची प्रमुख आकर्षणं केंद्रे आहेत. इथे फिरायला जाण्यासाठी मार्च ते ऑक्टोबर दरम्यानचा कालावधी बेस्ट मानला जातो.
उटी (तमिळनाडू)
तामिळनाडूतील उटी हे ठिकाण सर्वांनाच माहीत आहे. अनेक सिनेमांमध्ये उटीचे मनोहारी सौंदर्य पाहून अनेकजण थक्क होतात. मग वाट कसली बघताय या उन्हाळ्यात करा उटीला जाण्याचा प्लॅन. हे निलगिरी पर्वतरांगात वसलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान, बोटॅनिकल गार्डन, कलहट्टी धबधबा, दोडाबेट्टा उद्यान, फ्लॉवर शो, अशा अनेक वैशिष्ट्यांसह उटी पर्यटकांना आकर्षित करतं. दोडाबेट्टा हे पश्चिम पर्वतरांगांमधलं दुसर्या क्रमांकाचं शिखर आहे.
सराहन (हिमाचल प्रदेश)
शिमला जिल्ह्यातील सतलज घाटीमध्ये वसलेलं सरहान एक प्रमुख सुंदर पर्यटन स्थळ आहे. सफरचंदाच्या बागा, देवदारची जंगलं, लहान लहान नद्या आणि येथील खास घरांसाठी सरहान लोकप्रिय आहे. भीमाकली मंदिर आणि श्रीखंड महादेव ही देवस्थानही इथे प्रसिद्ध आहेत. बंजारा रिट्रीट, भाभा घाटी, बर्ड पार्क ही गर्दी खेचणारी ठिकाणं सरहानमध्ये आहेत. इथे तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी दिलखुलासपणे एन्जॉय करू शकता.
द्रास (जम्मू - काश्मीर)
द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. काश्मिरमधून लडाखला जाताना वाटेतच हे ठिकाण लागतं. त्यामुळे याला लडाखचं प्रवेशद्वार असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात इथलं तापमान उणे ४५° सेल्सिअसपर्यंत खाली जातं. त्यामुळं उन्हाळ्यातही हिवाळा अनुभवायचा असेल तर नक्की इथं भेट द्या. हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच आयुष्यभर स्मरणात राहील असाच असेल.
संदकफू (पश्चिम बंगाल)
संदकफू हे ठिकाण ट्रेकिंग करणाऱ्या लोकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. पश्चिम बंगाल ते सिक्कीम पर्यंत पसरलेल्या सिंगालिला पर्वतश्रेणीतीमध्ये संदकफू हे सर्वोच्च टोक आहे. या टोकाचं वैशिष्ट्य म्हणजे इथून तुम्हाला जगातील सर्वात उंच असणारी माऊंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, लाहोत्से, आणि मकालू ही चारही पर्वतं पहायला मिळतात. रोमांचक आणि थरारक प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे तुम्ही भेट देऊ शकता.
शिलॉंग - चेरापुंजी (मेघालय)
भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे शिलॉंग. इथून जवळच जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं चेरापुंजी-मौसीनराम ठिकाण आहे. इथले सजीव झाडांच्या मुळापासून बनवलेले झुलते पूल आकर्षण ठरतात. सततच्या पावसामुळे इथलं वातावरण तुम्हाला अतिशय अल्हाददायक वाटेल. इथे बर्याच कोळशाच्या खाणीही आहेत. त्यामुळे एक वेगळा उन्हाळा तुम्हाला इथे अनुभवता येऊ शकतो.
होर्सले हिल्स (आंध्र प्रदेश)
आंध्रप्रदेशच्या पर्वतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून या होर्सले पर्वतरांगांकडे पाहिलं जातं. मनोरम्य निसर्ग, प्रदूषणरहित स्वच्छ हवा, गुलमोहर, महोगणी, चंदनाचे आकर्षक वृक्ष म्हणजे होर्सले हिल्स. धाडसी खेळाची आवड असेल तर इथं रॅपलींग, ट्रेकींग, रॉक क्लायम्बींग वगैरेही करता येईल. इथून कौंडीण्य वन्यजीव अभयारण्यही जवळच आहे. म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही काही दिवस इथे हिरव्यागार झाड्यांच्या सावलीखाली घालवू शकता.
वायनाड (केरळ)
केरळमधलं आणखी एक मनमोहक स्थळ. याची ओळख 'केरळचा स्वर्ग' अशी आहे. पश्चिम घाटाचं विहंगम सौंदर्य पांघरून वायनाड हे स्थळ दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करतं. हे ठिकाण ३००० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होतं असं एक अनुमान आहे. येथील वातावरण इतकं वेगळं असतं की, तुम्ही तुमचा सर्व तणाव, त्रास विसरून जाल. त्यामुळेच इथे फिरायला येण्यासाठी अनेकांची पसंती असते.