(Image Credit : www.tripoto.com)
कुठेतरी फिरायला गेल्यावर बांबू राफ्टिंगचा अनुभव घ्यायला मिळाला तर कुणाला आनंद होणार नाही? कारण राफ्टिंगचा अनुभव वेगळा आणि रोमांचक असतो. हिरव्यागार जंगल आणि त्यामधून वाहणारी नदी असंच काहीसं चित्र बांबू राफ्टिंगचं असतं. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला केरळमधील पेरियार टायगर रिझर्वमध्ये यावं लागेल.
बांबू राफ्टिंग
याची सुरुवात सकाळी ८ वाजता केली जाते आणि त्यामुळे सकाळी सकाळी तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येतो. फोटोग्राफीच्या दृष्टीनेही ही वेळ चांगली असते. या राफ्टिंगपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जंगलात काही वेळ चालत जावं लागतं. ३ तासांची बांबू राफ्टिंग तुम्हाला अॅडव्हेंचरचा आनंद तर देईलच सोबतच तुमचं मनोरंजनही करेल. सुंदर निसर्गासोबतच पक्ष्यांची किलबिल हा प्रवास सुमधूर करतात. सायंकाळी ५ वाजता राफ्टिंग बंद होते.
राफ्टिंगचे नियम
एका बांबू राइडमध्ये जवळपास १० पर्यटक, एक फॉरेस्ट गार्ड आणि चार गाइड असतात. यातील काही गाईड्स हे आदिवासी लोक असतात. त्यांना या जंगलांबद्दल प्रत्येक गोष्ट माहीत असते. त्यामुळेच त्यांना सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा भागही करण्यात आलं आहे.
राफ्टिंग दरम्यान सुविधा
राफ्टिंगदरम्यान पर्यटकांना ब्रेकफास्ट सुद्धा दिला जातो. ब्रेड, जॅम, फळे, चहा, स्नॅक्ससोबत दुपारचं जेवणही दिलं जातं. या बांबूवर प्रवास करत तुम्ही पोहोचता पेरियार टायगर रिझर्व कॅचमेंट परिसरात.
जंगलात काही वेळ तुम्हाला थांबायचं असेल तर इथे बांबूपासून काही रुम्सही तयार करण्यात आल्या आहेत. यात थांबण्याचा अनुभवही तुम्हाला वेगळाच आनंद देईल.
कसे पोहोचणार?
रेल्वेमार्ग - कोट्टायम, हे येथून सर्वात जवळ असलेलं रेल्वे स्टेशन आहे. जे टेक्कडीपासून ११४ किमी दूर आहे.
हवाईमार्ग -तामिळनाडूचं मदुरै एअरपोर्ट येथून १३६ किमी दूर आहे आणि कोच्चीचं नेदुंबासेरी एअरपोर्ट १९० किमी अंतरावर आहे.