अजिंठा चौफुलीवर बेशिस्तीचा कळस रिक्षांनी व्यापला परिसर : इतर खाजगी वाहनांचीही भर
By admin | Published: April 12, 2016 12:38 AM
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास अधिकच हातभार लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असले तरी त्यांना कोणी जुमानत नाही की त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास अधिकच हातभार लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असले तरी त्यांना कोणी जुमानत नाही की त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न निर्माण होत आहे. थांबा कोठे, रिक्षा कोठे...अजिंठा चौफुलीवर रिक्षा थांबा कोठे आहे? असा प्रश्न नवीन व्यक्तीला सहज पडू शकेल. कारण या ठिकाणी चारही बाजूला सर्वत्र रिक्षाच रिक्षा दिसून येतात. मुळात येथे इच्छादेवी कडे जाणार्या रस्त्यावर रिक्षा थांब्याचा संघटनेचा फलक लावण्यात आला आहे. मात्र मनपाने ठरवून दिलेल्या थांब्याचा फलक दिसत नाही. अजिंठ्याकडे जाणार्या रस्त्यावर अधिक कोंडी...चौफुलीवरुन अजिंठ्याकडे जाणार्या वळणावरच मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या केल्या जाऊन प्रवाशांना विचारणा केली जाते. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसह कुसंुबा व इतर भागात जाणार्या रिक्षा मोठ्या प्रमाणात उभ्या असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. रिक्षा चालक मध्येच उभे राहत असल्याने वाहनांना अडथळा होऊन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत असते. सोबतच आयोध्यानगरकडून येणार्या रिक्षा व इतर वाहनांमुळे अधिकच अडचण होते. या ठिकाणी रिक्षांसोबत खाजगी बसेस् व इतर वाहनेदेखील एकाच ठिकाणी उभे केले जातात. थांब्याजवळ इतरांचीही घुसखोरी....अजिंठा चौफुलीवर इच्छादेवीकडे जाणार्या रस्त्यावर जो रिक्षा थांबा आहे तेथे रिक्षांसोबत इतर वाहनांचीही घुसखोरी झालेली दिसून येते. यामध्ये कालीपिली व त्याच्याच बाजूला ट्रक मोठ्या प्रमाणात उभ्या असल्याने येथे बरीचशी वाहने थेट रस्त्यावर आलेली असतात. यामुळे येथून बसस्थानकावर जाणार्या एस.टी. बसेस्नाही थांबावे लागते. चौफुलीवरुन शहरात अर्थात नेरी नाक्याकडे येणार्या रस्त्यावरही अशीच अवस्था असते. या जाणार्या व येणार्या रस्त्यावर आधीच रस्त्यापर्यंत अतिक्रमण असल्याने मध्येच रिक्षा उभ्या राहिल्या तर वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. खेडीकडे जाणार्या रस्त्यावरही रिक्षा, कालीपिली व इतर वाहने एकाच ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे येथेही कोंडी नित्याची झाली आहे. या प्रकाराकडे मात्र वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.