नावाप्रमाणेच तुम्हाला शांतता देणारी सायलेंट व्हॅली, पैसा वसूल ट्रिपसाठी करा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:08 AM2019-03-12T11:08:50+5:302019-03-12T11:12:36+5:30
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील सायलेंट व्हॅली असं ठिकाण आहे जिथे येऊ तुम्ही सुट्टीच मनमुराद आनंद घेऊ शकता.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील सायलेंट व्हॅली असं ठिकाण आहे जिथे येऊ तुम्ही सुट्टीच मनमुराद आनंद घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी-प्राणी आणि फूल-झाडे तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही इथे पैसा वसूल ट्रिप प्लॅनिंग करू शकता.
पलक्कड जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील सायलेंट व्हॅली आपल्या जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेत नीलगिरीचे डोंगर आणि दक्षिणेत मैदान यात असलेली ही व्हॅली सायलेंट व्हॅली नावाने ओळखली जाते. या ठिकाणाला १९८४ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला होता. २०१२ मध्ये नीलगिरी डोंगरांना नॅशनल हेरिटेजचा मानही मिळाला आहे. इथे येऊन तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ सकता. तसेच वेगवेगळ्या प्रजातींचे जनावरे बघू शकता.
सायलेंट व्हॅलीची खासियत
सायलेंट व्हॅलीमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये हत्ती, वाघ, सांबर, बिबट्या आणि जंगली डुक्कर प्रमुख आहेत. त्यासोबतच संपूर्ण परिसरात १००० पेक्षा अधिक प्रजातींचे फूल बघायला मिळतात. ११० प्रकारचे ऑर्किड, २०० प्रकारची फुलपाखरे, १६ प्रजातींचे पक्षी इथे बघायला मिळतात.
इतर नॅशनल पार्कसारखी गर्दी इथे बघायला मिळत नाही. शांत वातावरण जीव-जंतू बघणे आणि त्यांना आपल्या कॅमेरात कैद करणे यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. इथे जी जैव विविधता बघायला मिळते ती इतर ठिकाणी बघायला मिळणे कठीण आहे. कुंती नदी नीलगिरी पर्वताच्या २००० मीटर उंचीवरून वाहत घाटातून मैदानाकडे वाहत जाते. या नदीचं पाणी फारच पारदर्शी असतं.
सायलेंट व्हॅलीचा इतिहास
असे म्हटले जाते की, अज्ञातवासावेळी पांडव इथे येऊन थांबले होते. स्थानिक लोक या ठिकाणाला सैरन्धीवनम असं म्हणतात. सैरन्ध्री द्रौपदीचं नाव होतं. पण याचा शोध १८४७ मध्ये ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट वाइटने लावला होता. त्यांना सैरन्ध्री बोलणं कठीण जात होतं म्हणून त्यांनी सायलेंट व्हॅली म्हणणं सुरू केलं.
कधी आणि कसे जाल?
इथे पोहोचणे फार सोपे आहे. येथील जवळील एअरपोर्ट कोयंबटूर आहे. येथून तुम्ही एक ते दीड तासात पलक्कड पोहोचू शकता. या शहरात रेल्वे स्टेशनही आहे. जे देशातील रेल्वे नेटवर्कशी जोडलेलं आहे. तुम्ही इथे रस्ते मार्गानेही येऊ शकता.