- अमृता कदम
तुम्ही जर पहिल्यांदाच विमानप्रवास करत असाल तर तुमच्यासोबत ठेवायच्या सामानाचं (कॅरी आॅन लगेज) वजन किती असायला पाहिजे,? लगेजमध्ये काय सामान पॅक करायचं आणि केबिन बॅगमध्ये काय काय घेता येतं? कोणत्या गोष्टी तुम्ही विमानप्रवासादरम्यान नेऊ शकत नाही? याची थोडी माहिती असली म्हणजे विमानतळावर तपासणीदरम्यान काही अडचणी येत नाही आणि खोळंबाही होत नाही.विमानप्रवासाला निघताना काय न्यायचे आणि काय नाही? हे जर नीट माहिती असेल तर दंडाचा आर्थिक भुर्दंडही बसत नाही.
विमान प्रवास काय न्यावं? काय नाही?
1. आर्ट आणि क्राफ्टसाठी वापरण्यात येणाऱ्या बोथट किनारीची कात्री किंवा 6 सेंटिमीटरपेक्षा लहान आकाराचं ब्लेड तुम्ही सामानात ठेवू शकता. विणकामाच्या सुया सामानात असल्या तरी चालतील पण सुरी, रेझर ब्लेड्स, लाइटर, आगपेट्या मात्र अजिबात चालणार नाहीत.
2. आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेट ही अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रवासात तुम्ही तुमचे लॅपटॉप, टॅब, कॅमेरासारख्या वस्तूंसोबतच हेअर ड्रायर, स्ट्रेटनर्स किंवा इलेक्ट्र्रिकल रेझरही बरोबर घेऊ शकता.
3. तुम्हाला काही आजार असेल आणि तुमच्या ठराविक गोळ्या-औषध जर चालू असतील तर ही औषधं तुम्ही त्या केबिनमध्ये तुमच्यासोबत हँडबॅगमध्ये ठेवू शकता. लिक्विड सिरीपही सोबत ठेवता येतात पण सिरपची बाटली 100 मिलीपेक्षा जास्त मोठी असायला नको. पण तुम्हाला त्यापेक्षा जास्त सिरप सोबत ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या एअरलाइनला तशी आगाऊ कल्पना द्यावी लागेल. श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्ती इनहेलर्स, रेस्पिरेटर्स स्वत:जवळ बाळगू शकतात.
4. विमानप्रवासात केबिनमध्ये खाण्या-पिण्याच्या कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, किती प्रमाणात घ्याव्यात याबद्दलही अनेकांच्या मनात गोंधळ असतो. साधारणपणे द्रवपदार्थ केबिनमध्ये घेऊन जायची परवानगी नसते. पण लहान मुलं सोबत असतील, तर त्यांच्यासाठी लागणारे द्रवपदार्थ मुख्यत: दूध तुम्ही केबिनमध्ये सोबत ठेवू शकता. एखाद दुसरं फळ, सुकामेवा किंवा बॅगेच्या कोपऱ्यात बसणारे चॉकलेट्स किंवा कॅरेमलही तुमच्या हँडबॅगमध्ये असेल तर हरकत नाही. पण जॅम, मध, सिरप, योगर्ट, सूप, सॉस, तेलातुपासाठी मात्र स्ट्रिक्टली आॅब्जेक्शन असतं. त्यामुळे हे पदार्थ आपल्या सामानामध्ये नकोच.
5. तुमच्या कॅरी आॅन बॅग्जमध्ये खेळासाठी लागणारं कोणतंही सामान घेता येत नाही. तुम्ही खेळाच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी जात असाल, तर तुमचं स्पोर्ट्स किट तुम्हाला केबिनमध्ये नेता येणार नाही.
6.तुम्ही जर डिझायनर, पेंटर किंवा अन्य व्यावसायिक असाल आणि कामानिमित्त प्रवास करत असाल तर तुमच्या कामाची अवजारं तुम्हाला सोबत केबिनमध्ये घेऊन जाता येत नाहीत. केबिनमध्ये सोबत काय काय घेता येतं आणि कोणत्या गोष्टी तुम्ही लगेजमध्ये टाकू शकता याची कल्पना असेल तर सामान पॅक करणं सोप्पं जातं आणि चेकिंगदरम्यान तुमचा वेळही जात नाही.