- अमृता कदमपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलवाले काय करत नाहीत? आपणच कशी सर्वोत्तम सेवा देतोय हे दाखवण्यासाठी हॉटेल रूममध्ये अगदी विविध वस्तू सजवून ठेवलेल्या असतात. प्रथमदर्शनी या वस्तू आकर्षक दिसत असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीनं त्या सुरक्षित असतीलच असं नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी हॉटेल इंडस्ट्रीतले लोक आपल्या ग्राहकांना कधीच सांगणार नाहीत.हॉटेलमध्ये राहाताना..
1. एखाद्या पंचतारांकित, सुसज्ज हॉटेलची खोली बुक केली की तुम्ही निश्चिंत होता. एवढे पैसे मोजलेत म्हटल्यावर सगळं काही ठीकठाक असेलच असं तुम्ही गृहीत धरता, पण या भ्रमात राहू नका. अनेकदा हॉटेलच्या खोलीतली वीजेची बटणं, ब्लो ड्रायर्स किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही स्वच्छ केलेली नसतात. ह्युस्टन विद्यापीठानं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातले निष्कर्ष तर धक्कादायक आहेत. हॉटेलच्या खोलीत वापरल्या जाणा-या इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये कधी कधी टॉयलेटपेक्षाही जास्त जीवाणू असतात असं हे सर्वेक्षण सांगतं.
2. हॉटेलच्या खोलीत ठेवलेली कॉफी मशीन ही काही रोज साफ केली जात नाही. जास्त दिवस गॅप पडला असेल तर ही कॉफी मशीन जीवाणूंचं आगारच होऊन जातं. त्यामुळे ही कॉफी मशीन वापरण्याच्या आधी ती किती स्वच्छ आहे याचा आढावा घ्या. जर ती स्वच्छ नसेल तर हॉटेल कर्मचा-याला त्याची कल्पना देऊन ती साफ करवून घ्या.
3. हॉटेलच्या खोलीत ठेवलेले ग्लासही अनेकदा व्यवस्थित साफ केलेले नसतात. काही हॉटेल्समध्ये ग्लास हे नुसतेच पाण्यानं विसळून ठेवले जातात. पण तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर असे ग्लास वापरण्याआधी ते व्यवस्थित साफ आहेत की नाहीत याकडे लक्ष द्या.
4. अनेकदा हॉटेलचं बुकिंग आॅनलाइन केल्यास फायदा होतो. कारण आॅनलाइन बुकिंग केल्यास ज्या आॅफर मिळतील त्या थेट बुकिंगवर असतीलच असं नव्हे.
5. हॉटेलमधली स्वच्छता पाहताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चादर आणि बेडशीट. या गोष्टी स्वच्छ नसतील तर त्यातून जीवाणूंचा संसर्ग होण्याची अधिक भीती असते. त्यामुळे याबाबत बिनधास्त राहायचं असेल तर हॉटेलमध्ये चेक इन करतानाच या चादर-बेडशीट स्वच्छ आणि बॅक्टेरिया फ्री हव्यात अशी सूचना हॉटेल व्यवस्थापनाला द्या.
6. ज्या हॉटेलमध्ये तुम्ही वास्तव्य करता त्याचा दर हॉटेलच्या एका रूमवर किती खर्च केलाय यावर ठरत असतो. या दरानुसारच तुमच्या रूममध्ये वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे एखादी वस्तू कमी असल्यास त्याबाबत चौकशी करा.
7. बर्थडे पार्टी किंवा हनीमून अशा एखाद्या विशेष प्रसंगासाठी रूम बुक करत असाल तर अशावेळी कुठल्या तिस-या व्यक्तीकडून रु मचं बुकिंग अजिबात करु नका. कारण अशा काही स्पेशल बुकिंगसाठी हॉटेलच्या अनेकदा आॅफर असतात, पण तिस-या माणसाकडून बुक केल्यास तुम्हाला त्यापासून वंचित राहावं लागू शकतं.
8. अनेकदा हॉटेलवाले बुकिंग फुल झालंय असं सांगून दर वाढवायला बघतात. पण प्रत्येकवेळी हे खरं असेलच असं नाही. कारण प्रत्येक मोठ्या हॉटेलमध्ये काही रूम राखीव असतात, ज्या स्पेशल ग्राहकांसाठी राखीव ठेवल्या जातात.
9. कुठल्याही हॉटेलमध्ये वास्तव्य करताना आधी त्या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रायव्हसी मिळणार आहे का याची खात्री करा. हॉटेल कर्मचारी उगाच तुमची एखादी महत्वाची गोष्ट ऐकणार नाहीत याची काळजी घ्या. रूममध्ये प्रवेश करण्याआधी कॅमेरे लागलेले आहेत की नाही याचीही पाहणी करा.
10. अनेकदा हॉटेल चालक आपल्याकडे आलेल्या पर्यटकांची माहिती उघड करत नाहीत. फक्त त्यांना त्यासंबंधी कल्पना द्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला तुमचं बुकिंग सिक्रेट राहावं असं वाटत असल्यास त्याबद्दल हॉटेलला आगाऊ कल्पना द्या.
11. भरपूर फिरल्यावर हॉटेलच्या रूममध्ये येऊन निवांत होऊन आराम करावं वाटणं स्वाभाविक आहे. पण हॉटेलच्या रूममध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मात्र थकवा दूर होण्याऐवजी चिडचिडच होईल. म्हणून काही गोष्टींची आगाऊ माहिती घेणं केव्हाही चांगलं.