आपल्यापैकी प्रत्येकजण ट्रिप प्लॅन करताना अनेकदा विदेशी ठिकाणांना पसंती देतात. परंतु भारतामध्येच फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक स्थळं, डोंगर-दऱ्या, सरोवर, वाळवंट यांसारखी अनेक ठिकाणं आहेत. इतकचं नाही तर अनेक विदेशी पर्यटक येथे भारत फिरण्यासाठी येतात. आज आपण भारतातील अशा एका राज्यातील ठिकाणांबाबत जाणून घेणार आहोत, ज्याला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. हे राज्य म्हणजे मध्यप्रदेश. येथील ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असतं.
रायसेनचा किल्ला
मध्य प्रदेशमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर रायसेनला अवश्य भेट द्या. हे शहर तसं फार छोटं आहे परंतु अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी ओळखलं जातं. येथे मंदिर आणि मशीद दोन्ही एकाच जागेवर स्थित आहे. याव्यतिरिक्त येथे असलेला रायसेनचा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक दूरून येत असतात. 1500 फूटपेक्षा जास्त उंचावर असलेल्या या किल्ल्यावर 14 वेळा अनेकांनी हल्ले केले, परंतु तरीही हा किल्ला आपल्या जागेवर त्याच डौलात उभा आहे.
तितली पार्क
मध्यप्रदेशातील आणखी एक आकर्षण म्हणजे तितली पार्क. येथे 65 प्रजातींची फुलपाखरं आहेत. याव्यतिरिक्त या पार्कमध्ये 137 झाडंही लावण्यात आली आहेत. लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हे ठिकाण फार सुंदर आहे.
सांचीचा स्तूप
मध्यप्रदेशातील सांची जिल्हा फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथील सर्वात फेमस ठिकाण म्हणजे सांची येथील स्तूप. हा स्तूप अर्धगोल आकाराचा आहे. येथे भगवान बुद्धांच्या अवशेषांना जतन करून ठेवण्यात आले आहे. हा स्तूप म्हणजे भारतील प्राचीन वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणाला नक्की भेट द्या.
उदयगिरीच्या गुहा
मध्यप्रदेशात एकूण 20 प्राचीन गुहा आहेत. येथे अनेक प्रकारचे शिलालेखही पाहायला मिळतील. पण येथे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा सकाळचा वेळ राखून ठेवावा लागेल. कारण येथे रात्री फिरण्यास मनाई आहे.