पुणे : रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. मात्र या धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा चमत्कार आहे.
नेमका कुठे आहे हा देवकुंड धबधबा ?
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचे गाव आहे. याच भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते.त्यासाठी साधारण ८ किलोमीटर चालावे लागते. पुणे शहरातून देवकुंड धबधाब्यावर कसे जायचे ?चांदणी चौकातून अंदाजे ७० कि. मी अंतरावर भिरा परिसर आहे. चांदणी चौक - पिरंगुट - पौड - माले- मुळशी- चाचवली - वारक - निवे सारोळे - ताम्हिणी घाट परिसर उतरल्यानंतर विळे भागाड नावाचा एम.आय.डी सी. परिसर येतो. विळे भागाड येथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन अंदाजे ९ कि.मी गेल्यानंतर भिरा गावात पोहचता येते. भिरा गावात पोहचल्यानंतर काय करायचे ? ग्रामस्थांच्या वतीने गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली आहे. दुचाकी वाहनासाठी पार्कींगचा दर ३० रुपये आहे. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १० रुपये प्रवेश कर घेतला जातो. त्यानंतर थोडा वेळ आराम करून गाईड किंवा वाटाड्या शोधावा.
वाटाड्या कशासाठी हवा ?
पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात. जंगलातून वाट असल्याने गाईड घेणे गरजेचे आहे.जंगलातील वाट असल्याने चालताना जखम झाली, एखादा किडा चावला तर त्यावर गाईडकडे लागलीच नैसर्गिक उपाय असतात. काय करावे व काय करु नये याच्या सुचना गाईड वारंवार देत असतो.धबधब्यावर पोहचल्यानंतर पाण्यात किती फुट जायचे, कसे जायचे याचीही माहिती गाईडकडे असते.
या आहेत मुख्य सूचना :
- देवकुंड धबधबा पाहण्यासाठी लहान मुलांना घेवून जावू नये.
- चार तास चालण्याची तयारी असेल तरच जाण्याचा निर्णय घ्यावा.
- भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. दोन तास चालून धबधब्यावर पोहचल्यावर भुक लागते. त्यामुळे सोबत काहीतरी अन्नपदार्थ ठेवावेत.
- स्पोर्ट शुज अथवा पावसाळी शुज असला तरी चालेल. परंतू त्याला ग्रीप असणे गरजेचे आहे.