शाहरुख खान आणि करिना कपूरच्या 'अशोका' सिनेमातील ‘रात का नशा अभी आंख से गया नहीं’ हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्या गाण्यातील लोकेशन पाहून तुम्हाला हे परदेशातील लोकेशन असावं असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय? कारण हे लोकेशन बाहेरील नाही तर भारतातीलच आहे. हे गाणं भोपाळच्या भेडाघाटमध्ये शूट करण्यात आलं होतं. पांढऱ्या मार्बलच्या या डोंगरावर जेव्हा रात्री चंद्राचा प्रकाश पडतो तेव्हा नजारा काही औरच असतो. चला जाणून घेऊ या सुंदर ठिकाणाबाबत....
भेडाघाट
भेडाघाट हे एक छोटसं शहर आहे जे जबलपूरपासून २५ किमी अंतरावर आहे. नर्मदा नदीच्या तटावर स्थित या ठिकाणी आल्यावर तुम्ही सुंदर मार्बलचे सुंदर डोंगर, खळखळणारे झरे आणि प्राचीन मंदिरे बघू शकता. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण फार चांगलं आहे. रात्री चंद्राच्या उजेडासोबतच दिवसाही इथे एक वेगळंच रुप बघायला मिळतं.
भेडाघाटमध्ये फिरण्यासाठी ठिकाणे
भेडाघाट भलेही एक छोटं शहर आहे पण इथे फिरण्यासाठी ठिकाणांची अजिबात कमतरता नाही. मार्बल हिल्ससोबतच इथे धुआंधार धबधबा आणि प्राचीन ६४ योगिनी मंदिरं सुद्धा बघण्यासारखी आहेत.
भेडाघाट मार्बल रॉक
भेडाघाट मार्बल रॉकची सुंदरत्या त्याच्या फोटोंपेक्षा अधिक जास्त आहे. नर्मदा नदी आणि मा४बल रॉकची ही सुंदरता संपूर्ण ८ किमी परिसरात पसरली आहे. येथील मार्बल संपूर्ण देशभरात एक्सपोर्ट केले जातात. मार्बल रॉक जवळून पाहण्यासाठी इथे बोट राइड आणि केबल कार राइडची व्यवस्था आहे. बोट राइडदरम्यान ब्लॅक अॅन्ड व्हाइटसोबतच कलरफुल मार्बल्स सुद्धा बघायला मिळतात. पाण्यात मार्बलची पडणारी सावली कोणत्याही पेंटीगपेक्षा कमी भासत नाही.
धुआंधार धबधबा
भेडाघाटला गेल्यावर इथे भेट देण्यास अजिबात विसरु नका. ३० मीटर उंचीवरुन पडणाऱ्या पाण्यामुळे आणि त्यातून तयार होणाऱ्या धुरासारख्या दृश्यामुळे या धबधब्याला धुआंधार नाव पडलं आहे. रात्रीच्या वेळी इथे बाहेरुन येणाऱ्या लोकांसोबतच स्थानिकांची गर्दी असते.
कसे पोहोचाल?
जबलपूर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन हे भेडघाटला पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे. येथून शहर केवळ ३३ किमी अंतरावर आहे. जबलपूर मध्यप्रदेशातील मुख्य शहर आहे. त्यामुळे येथून भेडाघाटला पोहोचण्यासाठी बसेसही आहेत.