- अमृता कदमविदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं याची पुरेशा कल्पना नाहीये... खरंतर असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटला जे महत्व आहे, तसंच काहीसं प्रवासाच्या बुकिंगमध्येही आहे. बुकींगच्याबाबतीत योग्य वेळेला हिट केलं तर सिक्सर नाहीतर उगीचंच खिशाला खार लागला म्हणून पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे इतरांचं ऐकून, त्यांच्या अनुभवांवर अवलंबून राहून तिकीट बुकिंग करु नका. अनेकांना तिकीट बुकिंगसाठी रिसर्च, नियोजन आणि प्रत्यक्षात बुकिंग करणं हे कटकटीचं वाटतं. त्यामुळे ते सरळ स्वत:ला ट्रॅव्हल एजंटच्या हातात सोपवून मोकळे होतात. पण तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी एका नामांकित संस्थेनं बुकिंगबद्दल केलेल्या रिसर्चची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरु शकते.
स्कायस्कॅनर काय सांगतं?* ‘स्कायस्कॅनर’ या आघाडीच्या ग्लोबल सर्च इंजिननं भारतीयांसाठी जगात फिरण्याची सर्वोत्तम ठिकाणं कुठली आहेत याचा शोध तर घेतलाच, शिवाय त्यासाठी नेमकं कुठल्या काळात बुकिंग केलं तर फायदेशीर ठरेल याचाही निष्कर्ष काढला आहे. जवळपास 5 कोटी ग्राहकांची आकडेवारी गोळा करु न हे निष्कर्ष काढले आहेत त्यामुळे ते नक्कीच विश्वासार्ह आहेत. * स्कायस्कॅनरचा हा निष्कर्ष सांगतो की 24 आठवडे म्हणजे सहा महिन्यांआधी बुकिंग करणं हे सगळ्यात उत्तम. बाली, क्वालालांपूर यासारख्या ठिकाणी 25 आठवडे आधी बुकिंग करणं फायदेशीर ठरतं. भारतीयांसाठी तिकीटांचे जे दर आहेत, त्यात दोन आठवड्याआधी जादा मागणीमुळे 11 ते 16 टक्के वाढ होत असल्याचं या सर्वेक्षणात नमूद केलं आहे. * केवळ शेजारच्या देशांत फिरायला जाण्याऐवजी, सध्या युरोपमध्ये फिरायला जायचाही ट्रेंड वाढू लागला आहे. युरोपसाठी तुम्ही 6 महिन्यांआधी तिकीटं बुक केली तर तुम्ही तब्बल 17 टक्के बचत करु शकता. अर्थात हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टसारख्या ठिकाणी तुम्ही दोन महिने आधी प्लॅन केलं तरी विमान तिकीटांत 13 टक्के बचत होऊ शकते. स्पेनची राजधानी माद्रिद तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायची असेल तर अडीच महिने आधी बुकिंग केलेलं फायदेशीर ठरतं. . * जवळपास तीन तृतीयांश म्हणजे 70 टक्के भारतीय प्रवाशांना बुकिंगसाठी योग्य वेळ कुठली याची माहितीच नसणं म्हणजे आश्चर्य आहे असा शेरा त्या अहवालात नोंदवला गेलेला आहे. ‘दोन महिन्यांआधी बुकिंग केलं तरी चालतंय की’ या भ्रमात अनेक भारतीय राहतात आणि शेवटच्या मीनिटांपर्यंत धावाधाव करून खिशाला चाप लावून घेतात. * वर नमूद केलेली सगळी ठिकाणं फिरण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी सर्वांत योग्य आहे. अर्थात बालीसारख्या ठिकाणी जायचं असेल तर एप्रिल हा सर्वात उत्तम महिना असल्याचं स्कायस्कॅनरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे विनाकारण खिसा हलका करून घेणाऱ्या भारतीयांमध्ये आपला समावेश होऊ द्यायचा नसेल तर पुढच्या वेळी बुकिंगबद्दलच्या या महत्वपूर्ण गोष्टी जरूर लक्षात ठेवा.