दुबई जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. वाळवंटाच्या महासागरात वसलेले हे सर्वाधिक आकर्षक ठिकाण. येथेच जगातील सर्वात उंच अशी बुर्ज खलिफा नावाची इमारत पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण काचेची चमचमती बुर्ज खलिफा ८३० मीटर उंच आहे आणि सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध आहेत. पण या इमारतीत एक उणीव अगदी बांधकाम सुरु असल्यापासूनच राहून गेली आहे त्याची माहिती फारशी कुणाला नाही.
ही उणीव आहे इमारतीची सिवेज सिस्टीम. या अलिशान आणि सुंदर इमारतीची सिवेज सिस्टीम दुबईच्या ड्रेनेजला जोडली गेलेली नाही. त्यामुळे येथील मलनिस्सारण करण्याची पद्धत अजूनही प्राचीन आहे. रोज या इमारतीत घाण वाहून नेण्यासाठी ट्रकच्या रांगा लागतात. हा कचरा येथून भरून शहराबाहेर नेला जातो. इमारत बांधण्यासाठी दीड अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक रक्कम खर्च करताना मलनिस्सारण व्यवस्था का केली नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.
अर्थात त्यामागे एक कारण आहे. ही इमारत २००८ मध्ये पूर्णत्वास गेली तेव्हा दुबई आर्थिक संकटात होते. दुबईची ड्रेनेज व्यवस्था त्यावेळी मुळातच खराब होती. त्यामुळे या खराब व्यवस्थेला बुर्ज खलिफाचे सेवेज सिस्टीम जोडणे म्हणजे पैश्यांची बरबादी ठरत होती. त्यापेक्षा रोजच्या रोज कचरा बाहेर नेणे हा स्वस्त पर्याय स्वीकारला गेला. ३५००० रहिवासी राहू शकणाऱ्या या इमारतीत १ दिवसात १५ टनापेक्षा अधिक घाण जमते. सिवेज सिस्टीम विकसीत करण्याची योजना आखली गेली आहे मात्र २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही बुर्ज खलिफा मध्ये असलात आणि नारंगी ट्रकच्या रांगा दिसल्या कि खिडक्या बंद करून घ्यायला विसरू नका असा सल्ला दिला जातो.