गजानन दिवाण, सहायक संपादक, लोकमतgajanan.diwan@lokmat.com
पर्यटनाला जायचं म्हटलं की आनंद असतोच. मात्र सोबत टेन्शनही तेवढंच असतं. मोठा आणि लांबचा प्रवास असेल तर आणखी जास्त टेन्शन. सोबत काय घ्यायचं. ते कॅरी कसं करायचं? जायचं कसं? राहायचं कुठं? आवडत्या ठिकाणाजवळच हॉटेल मिळेल का? ते चांगलं असेल का? असे अनेक प्रश्न असतात. मग पर्यटनाच्या आधी किमान महिनाभरापासून तयारीला लागावं लागतं. सर्वसामान्य मराठी माणसासाठी नव्या असलेल्या ‘कॅराव्हॅन’ने पर्यटनाचं हे टेन्शन दूर केलं आहे.
घरातून निघाल्यापासून परत घरात पोहचेपर्यंत सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणारं देशातलं पहिलं व्यासपीठ ‘कॅराव्हॅन लाईफ’ हे स्टार्ट अप औरंगाबादेतून आकाराला येत आहे. केवळ प्रवासच नाही तर पर्यटनात आवश्यक असणारं सारं काही या एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. पर्यटनाला गेल्यानंतर स्थानिकांनीच बनविलेल्या स्थानिक डिशेस खायच्या आहेत. एखाद्याला ट्रेकिंग करायचंय. जंगल सफारी करायचीय. बाजूलाच टेंट मारून राहायचंय. अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत... बीटेक असलेल्या अनुलिका आरसीवाल सांगत होत्या. औरंगाबाद हे त्यांचं सासर. अनुलिका यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट. मेट्रो सिटीत न जाता आपल्या तरूणांना गावातच रोजगार निर्माण व्हावा या उद्देशातून अनेक आव्हाने पेलत त्यांनी हा स्टार्ट अप आकाराला आणला आहे.
कॅराव्हॅन हा प्रकार तसा आपल्यासाठी नवा. फॉरेनमध्ये तो नवा नाही. अनुलिका यांनीही पहिल्यांदा परदेशातच या पर्यटनाचा आनंद घेतला. भारतात अनेक चांगली पर्यटन स्थळं आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी राहण्याची, खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असेलच असे नाही. त्यामुळे कॅराव्हॅन आपल्याकडे चांगला पर्याय ठरू शकतो, या विचाराने झपाटलेल्या अनुलिका यांनी यावर काम सुरू केलं. भारतात कॅराव्हॅनची पहिली पॉलिसी २०१९मध्ये आली. पुढे केरळसह इतर काही राज्यांनंतर आता महाराष्ट्रानेही ही पॉलिसी मंजूर केली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा स्टार्ट अप सुरू करण्याचं ठरलं. जानेवारीत प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली.
कल्पना तर भन्नाट होती. मात्र हे वाहन औरंगाबादेतच तयार करायचं आव्हान तगडं होतं. अनुलिका यांनी ते पेललं. मेकानिकल इंजिनिअर अनंत वझरीनकर, इंटेरियर डिझायनर वैभव लोखंडे, मार्केटिंगमध्ये एमबीए झालेली जागृती शिंदे यांच्यासह २२ जणांची टीम ‘कॅराव्हॅन’च्या निर्मीतीत गुंतली. मूळ ढाच्याला हात न लावता आरटीओचे सर्व नियम पाळून मिनी व्हॅनची तोडफोड करायची आणि कॅराव्हॅन तयार करायची. पुण्या-मुंबईत या कामासाठी लेबर मिळणे कठीण नव्हते. औरंगाबादेत काय करणार? फर्निचरपासून ते एसी फिटिंगच्या लेबरपर्यंत सर्वांना प्रशिक्षण द्यावं लागलं. काही चुकांमुळं नुकसानही सहन करावं लागलं. पण औरंगाबादेत कॅराव्हॅन तयार करण्याचा हट्ट पूर्ण केला. आता अखेरचं पेंटिंगचं काम सुरू आहे. जुलैमध्ये ही कॅराव्हॅन महाराष्ट्राच्या रस्त्यावरुन धावू लागेल.
पर्यटनाला गेल्यानंतर कोणत्या हॉटेलात थांबलो याचंच आम्हाला मोठं कौतुक. हॉटेलमधल्याच सर्व सुविधा निसर्गाच्या सानिध्यात आणि आपणच घेऊन गेलेल्या गाडीत मिळाल्या तर? ‘कॅराव्हॅन’ हा तसाच प्रकार आहे. मिनीव्हॅनमध्ये म्हणजे साधारण १५बाय ६ फूट आकारात अख्खं घर बसविण्यात आलं आहे. यातही वाहनानुसार छोटे मोठे प्रकार आहेत. पर्यटनाला जाणारे किती? यावर ते ठरत असतं.
निसर्गाच्या कुशीत, एखाद्या डोंगराच्या कडेला ‘कॅराव्हॅन’ उभी करायची. मागचा दरवाजा उघडून त्यावर छानसा डायनिंग टेबल लावायचा. निसर्गाच्या सानिध्यात स्वत:च तयार केलेलं जेवण करायचं. आणि त्याच बेडवर आडवं व्हायचं किंवा आवडतं संगीत आणि हातात चहा-कॉफीचा कप. कॅराव्हॅनच्या बेडवर पडून डोंगरावरुन खुला निसर्ग न्याहाळत चहा-कॉफीचे घोट घ्यायचे. आजवर केवळ कल्पनेत असलेलं हे जग ‘कॅराव्हॅन’नं आपल्याला खुलं केलं आहे.
ज्या ठिकाणी रात्री या कॅराव्हॅन थांबणार आहेत तिथे पर्यटकांच्या प्रायव्हसीची आणि सुरक्षेची देखील तेवढीच काळजी घेतली गेली आहे. ज्या ठिकाणी ही कॅराव्हॅन मुक्कामाला थांबेल, त्या ठिकाणच्या स्थानिकांना पार्किंग चार्जेस, स्थानिक जेवण या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. या कॅराव्हॅनमुळं मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, ज्येष्ठांचा ग्रुप, अख्खे कुटूंब किंवा आई-वडिलांना एकट्याला देखील पर्यटनाला पाठविणं सोपं झालं आहे.
देशातला पहिला प्रकल्प औरंगाबादेत
कॅराव्हॅन पार्कसह इतर सर्व सुविधा देणारा देशातला पहिला प्रकल्प औरंगाबादेत आकाराला येत आहे. यातून स्थानिक तरूणांना रोजगार मिळाला आहेच. सोबत गावातच राहून करियरचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकते, हा आत्मविश्वासही मिळाला आहे.
हॉलिडे आणि होम ऑन व्हील्स
हॉलिडे आणि होम ऑन व्हील्स म्हणजे काय, तर थोडक्यात अख्खा वन बीएचके फ्लॅट गाडीतच. प्रवासाचं किंवा हॉटलचं कुठलंही बंधन नाही. वाट्टेल तिथं थांबायचं. हवं तर गाडीतच स्वयंपाक करायचा. खायचं-प्यायचं. टीव्ही पाहत किंवा वायफायवर एखादा पिक्चर पाहत बेडवर आरामही करायचा. बाथरुमपासून बेडरुमपर्यंत सर्व सुविधा अगदी गाडीतच.
कॅराव्हॅन लाईफ डॉट कॉमच्या नकाशावर अख्खा महाराष्ट्र
महाराष्ट्रात पर्यटनाच्या ठिकाणांची कमी नाही. कोकणच्या विस्तीर्ण किनापट्टीपासून तर पूर्व विदर्भातल्या जंगलापर्यंत सारं काही येथे उपलब्ध आहे. राज्यातील अशा ३५ ठिकाणांची यादी https://caravaanlife.com/ या वेबसाईटवर दिली आहे. थोड्याच दिवसांत ही यादी २०० वर जाईल.
बंधनमुक्त पर्यटन
कुठं जायचं, कुठं राहायचं, हे स्वातंत्र्य पूर्ण पर्यटकांचं. पर्यटनात कुठलंच बंधन राहणार नाही. फक्त पर्याय दिले जातील. निवड शेवटी त्या त्या पर्यटकाची असेल. माथेरानपासून ते गडचिरोलीपर्यंत आणि लेह-लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत या कॅराव्हॅनने आपल्याला प्रवास करता येणार आहे.
काय-काय असतं या कॅराव्हॅनमध्ये?
ओवन, गॅसशेगडी, फ्रीज, भांड्याकुंड्यासह अख्खं स्वयंपाकघर. टीव्ही. दोन बेड्स कम सोफासेट. प्रत्येक बेडवर दोन मोठ्या व्यक्ती आणि एक लहान मूल असे तिघे आराम करू शकतील एवढा स्पेस. शॉवर, कमोडसह बाथरुम. कपडे, इतर साहित्य ठेवण्यासाठी स्टोरेजची व्यवस्था. पिण्यासह सांडपाण्याची व्यवस्था. एसी, टीव्हीसह गाडीतील सर्व उपकरणे २४तास चालतील एवढा एनर्जी बॅकअप. शिवाय पूर्णवेळ वायफाय सुविधादेखील.
एका कॅराव्हॅनमध्ये दोन ते दहा पर्यटक
चालक आणि हेल्परशिवाय दोन ते दहा पर्यटकांना एकाचवेळी या कॅराव्हॅन पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना लहान-मोठी ‘कॅराव्हॅन’ उपलब्ध करून दिली जाईल, असं अनुलिका आरसीवाल यांनी सांगितलं.
देशातील पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कॅराव्हॅन लाईफने बळ दिले आहे. यामुळे अडगळीत पडलेली अनेक पर्यटनस्थळे उजेडात येतील. संभाजीनगर या माझ्या शहरातून याची सुरुवात होत आहे याचा मला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला प्रचंड अभिमान आहे. - डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार
सर्व छायाचित्रे : शकील खान