वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे फक्त भारत आणि चीनच नाही तर संपूर्ण जग त्रस्त आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी चीनने एक हटके संकल्पना शोधून काढली आहे. आता चीनने शोधलेली संकल्पना म्हणजे काहीतरी भन्नाट असणारचं, तसचं काहीसं आहे. दक्षिण चीनमधील गुइलिनमध्ये एक बबल हॉटेल उभारण्यात आलं आहे. या संकल्पनेला फक्त चीनमधीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पसंती मिळत आहेत.
चीनमध्ये उभारण्यात आलेलं हे बबल हॉटेल दोन डोंगरांमध्ये असलेल्या नदीजवळ तयार करण्यात आलं आहे. हे हॉटेल पूर्णपणे पारदर्शी आहे. आता तुम्ही गोंधळला असाल की, असं पारदर्शी हॉटेल का उभारलं असेल? खरं तर या हॉटलमध्ये बबलच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. यामगील मुख्य उद्देश म्हणजे, लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावं. त्यातच गुइलिन हे चीनमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. या शहरातील मुख्य व्यवसाय पर्यटन आहे.
सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, मागील वर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांमध्ये येथे आठ कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. या शहरात राहणाऱ्या लोकांची 20 टक्के कमाई ही फक्त पर्यटनामुळे होते. त्यामुळेच चीनमधील ईको टूरिज्म डेस्टिनेशन म्हणून या शहराचा विकास करण्यात येत आहे. तसेच येथील लोकांना असा विश्वास आहे की, 2020पर्यंत शहराच्या कमाईतील 27 टक्के हिस्सा हा पर्यटनातून येईल.
लोकांच्या पसंतीस उतरलेलं हे बबल हॉटेल दोन मजल्यांचे आहे. एखाद्या डबल डेकर विलाप्रमाणे हे हॉटेल तयार करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्व अद्ययावत सुविधा देण्यात आलेल्या आहेत. साधारणतः एका वर्षाआधी चीनव्यतिरिक्त फ्रान्समध्येही बबल हॉटेल तयार करण्यात आलं होतं.